भाजप नगरसेवक विकास कामात अडथळा आणतात; मुखेड्च्या नगराध्यक्षांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 05:57 PM2018-02-22T17:57:04+5:302018-02-22T17:59:02+5:30
मुखेड नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीत कॉग्रेसला जनतेने संधी दिली आहे. मात्र, जनमताचा अवमान करीत भाजपाचे नगरसेवक बहुमताच्या जोरावर विकासकामात अडथळा निर्माण करीत आहेत असा आरोप करत नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण करुन आपली व्यथा मांडली.
नांदेड : मुखेड नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीत कॉग्रेसला जनतेने संधी दिली आहे. मात्र, जनमताचा अवमान करीत भाजपाचे नगरसेवक बहुमताच्या जोरावर विकासकामात अडथळा निर्माण करीत आहेत असा आरोप करत नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज लाक्षणिक उपोषण करुन आपली व्यथा मांडली.
भारतीय जनता पक्षाचे मुखेड नगरपरीषदेत बहुमत आहे पण नगराध्यक्षपदी जनतेने थेट निवड करीत बाबुराव देबडवार यांचेवर मुखेडच्या नागरीकांनी विश्वास ठेवला आहे. नगराध्यक्ष देबडवार हे कॉग्रेस पक्षाचे असल्याने भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बहुमताच्या जोरावर विकासाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण करीत आहेत. जनतेतून थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षाला सुद्धा सभागृहाच्या बहुमताने काम करावे लागते त्यांना विशेष अधिकार नाहीत त्यामुळे नगराध्यक्ष असुनही भाजपच्या असहकाराच्या भुमिकेने शहराचा विकास अडला असल्याचा आरोप देबडवार यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. जनतेच्या विकासासाठी न्याय मागण्यासाठी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाद्वारे आपल्या मागण्या सादर केल्या.
या आहेत मागण्या
सभागृहात विरोधकांचे बहुमत असल्याने महत्वाचे ठराव पास होत नाहीत व खर्चास मान्यता मिळत नसल्याने कलम 309 च्या प्रस्तावास मान्यता द्यावी, घनकचरा व्यवस्थापनची निविदा नव्याने मागविण्यात यावी, शहराला पाणीपुरवठा करणार्या मौजे जुन्ना येथील विहिरीचे अनधिकृतरीत्या वापरणार्यांवर कार्यवाही करुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, औरंगाबाद खंड पीठाचे रिट याचिका क्र. 12464/ 2017 वरील आदेशाप्रमाणे योग्य ती कार्यवाही करावी, म्हाडाची जमीन परत घेऊन घरकुल योजनेसाठी आरक्षित करावी, छ. शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळयाचे रखडलेले काम पुर्ण करावे, जनतेतून थेट निवड झालेल्या नगराध्यक्षांना विशेष अधिकार द्यावेत, नगरपरीषदेतील रिक्त पदे भरावीत, पुर्णवेळ मुख्याधिकारी व पाणी पूरवठा अभियंता नेमावा, वैशिष्ठपुर्ण कामाचे प्रस्ताव सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, केन्द्र सरकारच्या आय.डी.एस.एम.टी अंतर्गत व्यापारी संकुलाचे रखडलेले बांधकाम चालु करावे तसेच नगर परीषदेच्या साडे नऊ एकर जमीनीवर क्रीडासंकुल, गार्डन, मॅट्रीकपर्यंत शाळा, वाचनालय व दवाखाना उभारावा यामागण्याचा समावेश निवेदनात आहे.
मुखेड नगराध्यक्ष बाबुराव देबडवार यांच्या लाक्षणिक उपोषणाला कॉग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी जि.प अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर यांनी भेट दिली. तर मुखेड भाजपाचे जेष्ठ कार्यकर्त टी. व्ही. सोनटक्के, कांग्रेस प्रवक्ते दिलीप कोडगिरे, प्रल्हाद सावकार राजकूंठवार, शिवकुमार बंडे, तेजेराव पाटील, नगरसेवक मैनोद्दुन चाँदपाशा, विनोद आडपेवार, एनएसयूआयचे खाजा धुंदी, जयप्रकाश कानगुले, शिवाजी गायकवाड, संजय नाईनवाड, नागेश देवके, जयप्रकाश कानगुले, शंकर नाईनवाड, बालाजी बाभळे, लक्ष्मीकांत पांचाळ, गौतम गवळे, प्रकाश इंगळे उपस्थित होते.