भाजप जिल्हाध्यक्षांच्या निवडी यंदा होणार बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 02:34 PM2019-12-18T14:34:32+5:302019-12-18T14:42:05+5:30
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी होणार घोषणा
नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरु असून यंदा जिल्हाध्यक्षांच्या निवडी बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ६४ पैकी किमान ५० जिल्हाध्यक्षांची बिनविरोध निवड करून ही घोषणा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी करण्याचे नियोजन पक्षातर्फे सुरु आहे.
प्रदेश भाजपच्या वतीने १ डिसेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत जिल्हाध्यक्ष आणि जिल्हा समिती सदस्यांची निवड करण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यानंतरही भाजपा सत्तेबाहेर गेली. या सर्व घडामोडीत संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा रेंगाळली. नव्या राजकीय फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर किमान जिल्हाध्यक्ष आणि त्यापुढील पदांच्या निवडीवरून जिल्ह्या-जिल्ह्यात गट-तट पडू नयेत यासाठी या निवडी सर्वसंमतीने करून पदाधिकारी एकसंघ असल्याचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये देण्याचा विचार पुढे आला. त्यातूनच किमान ५० जिल्हाध्यक्षांची निवड बिनविरोध करण्याचे व या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा २५ डिसेंबर रोजी नियोजन पक्षाने केले आहे. या पदासाठी दोन किंवा त्याहून अधिक नावे पुढे आल्यास निवडणुका न घेता प्रदेश भाजपाने नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत एका नावावर मतैक्य घडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
वर्षअखेर प्रदेशाध्यक्षांची होणार निवड
जिल्हाध्यक्षांच्या निवडींनंतर जिल्ह्यांतून प्रदेश परिषद सदस्यांची निवड केली जाणार आहे. यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड होणार असून ही निवड ३१ डिसेंबरपूर्वी जाहीर करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचेही सूत्रांनी सांगितले.