'भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गाव जेवण'; चंद्रकांत पाटलांची कार्यकर्त्यांना ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 12:08 PM2021-10-20T12:08:48+5:302021-10-20T12:09:36+5:30
देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे.
नांदेड: जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आगळी-वेगळी ऑफर दिली. भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गावजेवण देणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे गाव जेवणात स्वतः सहभागी होणार असल्याचंही पाटील म्हणाले.
देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोट निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपने अनेक नेत्यांना देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणूकीसाठी उतरवलं आहे. दरम्यान, काल आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या ऑफीरमुळे एकच चर्चा रंगली. 'भाजपला आघाडी देणाऱ्या गावांना माझ्यातर्फे गाव जेवण देणार आणि त्यावेळी मी स्वतः उपस्थित असणार', अस पाटील म्हणाले.
देगलूर पोटनिवडणुकीतील आमचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ उपाध्यक्ष डॉ. विठ्ठल कुडमुलवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्तेही उपस्थित होते. pic.twitter.com/17qmc0isL4
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 19, 2021
भाजपकडून अनेक नेत्यांकडे प्रचाराची धुरा
भाजपने या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोठ्या नेत्यांची फळी उतरवली आहे. आतापर्यंत रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, भागवत कराड आणि आशिष शेलार यांच्यासह अनेक नेते प्रचारासाठी येत आहेत. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी देगलूर पोट निवडणुकीसाठी गावोगावी प्रचार सभा घेतल्या तर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हेदेखील जोरदार प्रचार करत आहेत.
चंद्रकांत पाटलांनी यापूर्वीही दिली ऑफर
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतही अशच प्रकारची एक ऑफर दिली होती. सांगली महापालिकेत कार्यक्रम करणाऱ्या नेत्यांना तुम्ही दोन छोटे शॉक दिले आहेत. एकदा एक मोठा शॉकद्या, तुमचा सोन्याचा मुकुट घालून सत्कार करतो, असं पाटील म्हणाले होते.