ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप जिल्ह्यात एकटे पडण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:43 AM2020-12-17T04:43:21+5:302020-12-17T04:43:21+5:30
नांदेड : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात सर्वाधिक १ हजार १५ ...
नांदेड : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राज्यात सर्वाधिक १ हजार १५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका नांदेड जिल्ह्यात होणार असल्याने प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरूवात केली आहे. महाविकास आघाडीने ही निवडणूक एकत्रित लढण्याचा निर्णय घेतल्यास निवडणुकीत भाजप एकटी पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीसारख्या स्थानिक निवडणुकीत तीन पक्षाची मोटबांधायची कशी? याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर असणार आहे. हे करताना बंडखोरी होण्याची शक्यता असून ती भाजपाच्या पथ्यावर पडू शकते. तूर्त तरी प्रमुख पक्षांनी गावनिहाय पॅनल उभारणीसाठी चाचपणी सुरू केली आहे.
या निवडणुकांसाठी २३ ते ३० डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र स्वीकारली जाणार आहे. त्यांची छाननी ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ पासून होणार असून ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होऊन निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. १५ जानेवारी रोजी मतदान होऊन १८ रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. निवडणुकीसाठी अत्यल्प कालावधी राहिल्याने प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीसह भाजपाने यासाठीचे नियोजन सुरू केले आहे. वंचित बहुजन आघाडीनेही आपले बळ असलेल्या भागातील ग्रामपंचायतीत पॅनल देण्यासाठी बैठकावर भर दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसातच निवडणुकीचे नेमके चित्र पुढे येईल. तूर्त तरी मोचर्चेबांधणीवर सर्वांचाच भर आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचाही कस लागणार आहे. आपापल्या मतदार संघातील जास्तीत जास्त ग्रामपंचायती स्वत:च्या पक्षाकडे खेचण्याची रणनिती आमदारांकडून आखली जात आहे.