विश्वास गमाविल्यानेच भाजपाची ओहोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:02 AM2018-12-16T01:02:01+5:302018-12-16T01:03:02+5:30
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मते घेतलेल्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे एकही काम केले नाही़ महागाईने आज कळस गाठला असून सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे़
मुदखेड : अच्छे दिनचे स्वप्न दाखवून मते घेतलेल्या भाजपा सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे एकही काम केले नाही़ महागाईने आज कळस गाठला असून सर्वसामान्यांना जगणे मुश्कील झाले आहे़ हे सरकार यापुढेही काही करेल, असा विश्वास आता खुद्द जनतेमध्येच राहिला नसल्याने राजस्थान, मध्य प्रदेशच नव्हे तर देशभरात भाजपाची ओहोटी सुरू झाली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी केले़
शहरातील भोकर रोडवरील नई आबादी परिसरात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते़ मंचावर काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नगराध्यक्ष मुजिब अन्सारी जहांगीरदार, उपाध्यक्ष बालाजी गोडसे, माजी उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे, गटनेते माधव कदम, श्याम चंद्रे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ नोटबंदीचा शासनाचा प्रयोग पूर्णपणे फसला आहे़ नोटबंदी जाहीर करताना त्यामुळे दहशतवाद संपेल असा दावा शासनाने केला होता़ पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या घरी जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोजन केले़ दुसरीकडे देशाचे संरक्षण करणारे जवान दररोज शहीद होत आहेत़ दहशतवाद तर थांबलाच नाही, उलट त्याची व्याप्ती आणि तीव्रता वाढल्याचे सांगत याला सर्वस्वी केंद्र सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे ते म्हणाले़ शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करू अशा वारंवार घोषणा सरकारकडून केल्या जातात़ प्रत्यक्षात शेतकºयांची अवस्था या सरकारच्या काळात दयनीय झाली आहे़ सुमारे १२ हजारांहून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत़ मात्र त्यानंतरही सरकारला जाग येत नसल्याचे सांगत शेतकºयांसह सर्वसामान्य नागरिक येणाºया निवडणुकीत या सरकारला धडा शिकवतील, असा विश्वासही खा़चव्हाण यांनी व्यक्त केला़ मोदी सरकारच्या दबावामुळेच रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला राजीनामा द्यावा लागल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला़
मुदखेड शहर स्वच्छ, सुंदर असावे यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे़ नगरपालिकेच्या माध्यमातून पाणी, स्वच्छतेसह घरकुलाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे़ शहराच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला़ तालुक्याच्या ग्रामीण भागात आमदार निधीतून २० कोटींची तर मुदखेड शहरात १४ कोटींची कामे सुरू असल्याचे सांगत येणाºया काळात सर्वांच्या सहकार्याने शहराचा चेहरामोहरा बदलू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली़