Video: पाकिस्तानच्या बिलावल भुट्टोंचा पुतळा जाळताना भाजप खासदारांचा हात भाजला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 04:08 PM2022-12-17T16:08:54+5:302022-12-17T16:15:53+5:30
आंदोलना दरम्यान आगीचा भडका उडून नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर झाले जखमी
नांदेड:पाकिस्तानच्या विदेश मंत्र्यांच्या वक्तव्या विरोधात आंदोलनादरम्यान प्रतीकात्मक पुतळ्याला आग लावताना आगीचा भडका उडून भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा हात भाजल्याची घटना आज दुपारी घडली. जवळ असलेल्या कार्यकर्त्यांनी वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला.
पाकिस्तान विदेश मंत्री बिलावल भुट्टोने भारतीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आले. पाकिस्तान विरोधी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलकांनी माफीची मागणी केली. निदर्शने सुरु असतानाच कार्यकर्त्यांनी भुट्टोंचा प्रतीकात्मक पुतळा आणला. त्यावर पाकिस्तानचा झेंडा होता. या प्रतीकात्मक पुतळ्याला दहन करण्यासाठी कार्यकर्ते समोर आले.
नांदेड: पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोंचा पुतळा जाळताना आगीचा भडका उडून भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचा हात भाजला #BJP#BilawalBhuttopic.twitter.com/jECh6QN8OU
— Lokmat (@lokmat) December 17, 2022
दरम्यान, जोरदार घोषणाबाजी सुरु असताना भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे आग लावत होते. तेवढ्यात एका कार्यकर्त्याने बॉटलमधून पेट्रोल टाकले. यामुळे अचानक आगीचा भडका उडाल्याने चिखलीकर यांच्या शर्टच्या बाहीने पेट घेतला. पेट घेतल्याचे लक्षात येताच जवळ उभ्या असलेल्या कार्यकर्त्यांनी तात्काळ आग विझवली. मात्र, या घटनेत खा. चिखलीकर यांचा हात किरकोळ भाजल्या गेला आहे.