भाजपाची धोरणे केवळ श्रीमंतांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:35 AM2019-04-08T00:35:43+5:302019-04-08T00:39:26+5:30
देशातील व राज्यातील भाजप सरकार मनुवादी विचारांचे व सामाजिक विषमता निर्माण करणारे आहे. या सरकारची धोरणे केवळ मोजक्या श्रीमंतांसाठी आहेत. त्यामुळे या भाजपा सरकारला खाली खेचा, काँग्रेसला सत्ता द्या.
नांदेड : देशातील व राज्यातील भाजप सरकार मनुवादी विचारांचे व सामाजिक विषमता निर्माण करणारे आहे. या सरकारची धोरणे केवळ मोजक्या श्रीमंतांसाठी आहेत. त्यामुळे या भाजपा सरकारला खाली खेचा, काँग्रेसला सत्ता द्या. आपल्या सर्व मागण्या पूर्ण करु, असे आश्वासन काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खा. अशोकराव चव्हाण यांनी दिले.
मातंग समाज आणि अखिल भारतीय माळी महासंघाची बैठक जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात घेण्यात आली. तसेच धनेगाव येथे वाहन मालक - चालक संघटनेच्या बैठकीतही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी विचार मांडले.
यावेळी आ. डी. पी. सावंत, गोविंद शिंदे नागेलीकर, नरेंद्र चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती. देशात सामाजिक समतोल असणे महत्त्वाचे आहे. मात्र भाजप सरकारच्या काळात सामाजिक विषमता निर्माण करण्यात आली आहे. घोषणांद्वारे केवळ कोपराला गुळ लावण्याचे काम भाजप करीत असल्याची टीकाही खा. चव्हाण यांनी केली. ते म्हणाले, माळी समाज व मातंग समाज हा काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदार आहे. सत्तेचा वाटा सर्व समाजाला मिळाला पाहिजे. ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवनातून उठवण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला आहे. काँग्रेस सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाने सामाजिक समतोलाची विचारसरणी जिल्हा पातळीपर्यंत रुजवली आहे.
केवळ मताची विभागणी टाळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी व समाजवादी पक्षाला मते देवू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
गुरुद्वारा प्रबंधक समितीमध्ये लोकनियुक्तऐवजी शासननियुक्त अध्यक्ष करण्याचा भाजप सरकारचा डाव हाणून पाडला पाहिजे, असेही खा. चव्हाण यांनी सांगितले.
या सभेत बोलताना आ. डी. पी. सावंत यांनी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या कुटुंबियांचा आॅटोमोटिव्हचा व्यवसाय आहे. पण भाजपचे उमेदवार मात्र बेनामी दारु दुकाने इतरांच्या नावे करुन पैसे कमावतात.
दारुमुळे कोणाला रोजगार मिळत नाही तर अनेकांचे संसार देशोधडीला लागतात. अशोक चव्हाण हे दारुचे डीलर नव्हे तर जनतेचे लीडर आहेत, असेही आ. सावंत यांनी सांगितले. मोदीची नांदेडमध्ये झालेली सभा म्हणजे जुनी कॅसेट आहे. या कॅसेटमध्ये त्यांना उमेदवाराचे नावही आठवले नाही. लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा उल्लेखच पंतप्रधानांनी केला नसेल तर त्यांना जनतेने काय म्हणून मते द्यावी, असा सवालही आ. सावंत यांनी व्यक्त केला.
यावेळी आनंद गुंडले, अॅड. सुरेंद्र घोडजकर, प्रदीप वाघमारे, रामेश्वर भालेराव, सुखविंदरसिंघ हुंदल, सखाराम शितळे, प्रल्हाद सोळंके, गणपतराव उमरे, गणेश तादलापूरकर, भीमराव जेठे, शेख फारुख, भागिंदरसिंघ घडीसाज आदींची उपस्थिती होती.