गोरठेकरांच्या उमेदवारीला भाजप कार्यकर्त्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 08:04 PM2019-08-05T20:04:27+5:302019-08-05T20:05:53+5:30
‘बाहेरचा उमेदवार नको’ची मागणी
नांदेड : ऐनवेळी इतर पक्षातून भाजपात आलेल्या कोणत्याही उमेदवाराला किमान पाच वर्षे पक्षात काम करू द्यावे, त्यानंतरच त्यांच्या उमेदवारीबाबत विचार व्हावा, असे म्हणत भोकर तालुक्यातील निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी बापूसाहेब गोरठेकर यांच्या उमेदवारीला उघड विरोध दर्शविला.
भोकर येथे ओम लॉन्स येथे झालेल्या मेळाव्यात भाजप निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, नागनाथ घिसेवाड, भोकर विधानसभा प्रमुख प्रविण गायकवाड, माजी नगराध्यक्ष राम चौधरी, नीलेश देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष किशोर लगळूदकर, गणेश कापसे, तालुकाध्यक्ष गणपत पिट्टेवाड, शंकर मुतकलवाड, सुधाकर कदम, योगेश हाळदे, संजय सोनटक्के उपस्थित होते. अनुकूल परिस्थिती असताना आयात उमेदवाराला उमेदवारी देणे हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा अपमान आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही, असा संतप्त इशारा यावेळी देण्यात आला आहे. भोकर विधानसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार असताना इतर मतदारसंघातून उमेदवार आयात करण्याची वेळ भाजपवर का आली? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पक्षाने जर आयात उमेदवाराला माथी मारले तर त्याचा प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी घेतली.
भोकर विधानसभेसाठी डॉ. माधवराव किन्हाळकर, नागनाथ घिसेवाड, राम चौधरी, प्रवीण गायकवाड, नीलेश देशमुख हे इच्छुक आहेत. आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाल्यास आम्ही एक दिलाने काम करू, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.