कोरोना संकटातही भाजपाचे गलिच्छ राजकारण; माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी डागली तोफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:11 PM2020-05-28T19:11:46+5:302020-05-28T19:17:21+5:30
राजभवनाचे उंबरठे झिजवून ही मंडळी गलिच्छ राजकारण करीत आहेत. सरकार अस्थिर करण्याच्या या कारस्थानाची कीव येते असेही त्या म्हणाल्या.
नांदेड : कोरोना संकटाने जगभर थैमान घातले आहे. राज्यातही अनेक मृत्यू झाले आहेत. प्रत्येकाच्या दारात मृत्यू उभा आहे. अशा या परिस्थितीत सर्वांनी एकत्रित येवून या संकटाचा सामना करणे अपेक्षित असताना भाजपाचे काही नेते सत्तेसाठी राजभवनाचे उंबरठे झिजवत आहेत. हे खेदजनक तसेच संतापजनक असल्याची टिका करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्या सूर्यकांता पाटील यांनी भाजपाला घरचा आहेर दिला आहे. जे काही घडते आहे ते वेदनादायी असल्याचे सांगत हा सर्व प्रकार पाहूनच राजकारणात रहावे की नाही? असा प्रश्न पडतो. असे सांगत आपण आपली भूमिका लवकरच जाहीर करु, असेही त्या म्हणाल्या
सुर्यकांता पाटील यांनी सोशल मिडीयावर संदेश टाकून आपण राजकारणातून बाहेर पडत असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमिवर त्यांच्याशी संपर्क साधला असता, राज्यात कोरोनाचे संकट गंभीर आहे. या परिस्थितीत सरकारच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी काही मंडळी सत्तेसाठी राजभवनाचे उंबरठे झिजवून गलिच्छ राजकारण करीत आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यात महाविकास आघाडीला अपयश आल्याचा कांगावा करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात आणीबाणी लागू करावी, अशी मागणी करत राजभवनाला खेटे घातल्याचे सांगत, भाजपाच्या राजकारणावर त्यांनी घणाघात टिका केली.
राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:च्या जीवाची चिंता लागली आहे. मरण दारात उभे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चांगले काम करीत आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ते प्रयत्नशिल असताना ज्यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगले, ज्यांना अनुभव आहे अशा मंडळींनी आपल्या अनुभवाचा फायदा सरकारला करुन देणे अपेक्षित होते. मात्र राजभवनाचे उंबरठे झिजवून ही मंडळी गलिच्छ राजकारण करीत आहेत. सरकार अस्थिर करण्याच्या या कारस्थानाची कीव येते असेही त्या म्हणाल्या.