भाजपाची लढत वंचितसोबतच; विरोधीपक्ष नेताही वंचितचाच दिसेल : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 12:30 PM2019-08-31T12:30:02+5:302019-08-31T14:40:02+5:30
शरद पवारांनी काळाची पावले ओळखावीत
नांदेड : शरद पवार मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही, मात्र त्यांचा पक्ष अगोदरच ठराविक भागात मर्यादित होता़ अलिकडील दिवसात पंतप्रधान मोदींच्या कामावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीतील अनेकजण भाजपामध्ये येत आहेत़ या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत भविष्य असल्याचे वाटत नसल्यानेच ते पक्ष सोडत आहेत़ पवारांनी ही काळाची पावले ओळखली पाहिजेत अशी टिप्पणी करीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपाची खरी लढत वंचित बहुजन आघाडीसोबत असेल़ निवडणुकीनंतर विरोधी पक्ष नेताही वंचितचाच दिसेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़
शनिवारी सकाळी नांदेड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ यावेळी कामगार मंत्री सभांजी पाटील निलंगेकर, भाजपा प्रदेश महासचिव आ़ सुजितसिंह ठाकूर, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, खा़ प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष आ़ राम पाटील रातोळीकर, शहर महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते आदी उपस्थित होते़ आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपाची शंभर टक्के युती राहिल, असे स्पष्टीकरणही फडणवीस यांनी यावेळी दिले़ नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशावर शिवसेनेने आक्षेप घेतल्याबाबत विचारले असता, नारायण राणे हे सध्या भाजपमध्येच आहेत, ते भाजपाचे विद्यमान खासदार आहेत़ त्यांचा पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा विषय आहे़ याबाबतचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेवून करण्यात येईल असे ते म्हणाले़ लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीवर भाजपाचा बी टीम असल्याचा आरोप करीत होती, परंतु लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिल्यानंतर वंचितची टीम ए तर काँग्रेसची टीम बी झाल्याचे स्पष्ट झाले आहे़ विधानसभा निवडणुकीतही आमचा खरा सामना वंंचितसोबतच रंगेल असे ते म्हणाले़
पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली़ केंद्रिय गृहनिर्माण मंत्रालयाने नुकतीच तीन लाख घरांना मंजुरी दिली आहे़ यातील सव्वालाख घरे महाराष्ट्रासाठी आहेत़ आजवर राज्यातील ११ लाख २० हजार बेघरांना आवास योजनेच्या माध्यमातून घरे दिल्याचे सांगत या योजनेअंतर्गत पुढील वर्षीपर्यंत उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल याबरोबरच २०११ च्या बेसलाईन सर्वेत ज्यांची नावे आलेली नाहीत, नव्याने सर्वे करून अशांना या यादीत समाविष्ट करून घेण्यात येत आहे़ या सर्वांनाही २०२२ पर्यंत हक्काची घरे मिळतील असे त्यांनी सांगितले़
बाभळी बंधाऱ्याचे पाणी तेलंगणात वाहून जात आहे़ याचा कोणताही फायदा महाराष्ट्रातील भागाला मिळत नाही़ आॅक्टोबरअखेर गेट टाकणे चुकीचेच आहे़ आम्ही याबाबत सर्वोच्च न्यायालयात जात आहोत़ दुसरीकडे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशीही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले़