नांदेडात भाजपातील अंतर्गत वाद शमेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:38 AM2018-10-04T00:38:41+5:302018-10-04T00:40:11+5:30
महापालिका निवडणुकीत ५१ प्लसचा नारा देणाऱ्या भाजपाला निकालानंतर मात्र केवळ ६ जागा मिळाल्या. या सहा जागाही एकत्र ठेवण्यात भाजपाला अपयशच आले असून दहा महिन्यांच्या लढ्यानंतर मिळालेले विरोधी पक्षनेतेपदही पक्षातीलच नगरसेवकांच्या न्यायालयीन लढ्याने आता पत गमावण्याची वेळ भाजपावर आली आहे. पक्षामध्ये सुरू असलेला हा वाद मिटवण्यासाठी आता थेट मराठवाडा संघटक बुधवारी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका निवडणुकीत ५१ प्लसचा नारा देणाऱ्या भाजपाला निकालानंतर मात्र केवळ ६ जागा मिळाल्या. या सहा जागाही एकत्र ठेवण्यात भाजपाला अपयशच आले असून दहा महिन्यांच्या लढ्यानंतर मिळालेले विरोधी पक्षनेतेपदही पक्षातीलच नगरसेवकांच्या न्यायालयीन लढ्याने आता पत गमावण्याची वेळ भाजपावर आली आहे. पक्षामध्ये सुरू असलेला हा वाद मिटवण्यासाठी आता थेट मराठवाडा संघटक बुधवारी नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.
महापालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सर्व यंत्रणा लावणा-या भाजपाला केवळ सहा जागा मिळाल्या. काँग्रेसने भाजपाचा धुव्वा उडवत ७३ जागांवर विजय मिळवला. सहा जागा मिळवलेला भाजप एकत्र राहील, अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली. दुस-या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाला विरोधी पक्षनेतेपद द्यावे, अशी मागणी पक्षाने केली. पक्षाने यासाठी गुरप्रितकौर सोडी यांचे नाव सुचवले. प्रारंभी सत्ताधारी काँग्रेसने विरोधी पक्ष नेतेपदाची निवड या ना त्या कारणामुळे पुढे ढकलली. राज्यात सत्ता असतानाही नांदेड महापालिकेत मात्र भाजपाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी मोठा लढा द्यावा लागला. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत अर्जबाजारी करावी लागली. मात्र काँग्रेसने राजकीय डावपेच खेळत विरोधी पक्षनेते पदासाठी महापालिकेत एकमेव निवडलेल्या सेनेच्या तसेच एकमेव अपक्ष उमेदवाराने विरोधी पक्षनेते पदासाठी दावा केला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडे मार्गदर्शन मागवले असल्याचे सांगून वेळ मारुन नेली होती. जवळपास दहा महिन्यांच्या लढाईनंतर अखेर काँग्रेसने सभागृहात विरोधीपक्ष नेतेपदाचा विषय ठेवला. हा विषय ठेवला असताना भाजपाच्या पाच नगरसेवकांनी मात्र सभेला अनुपस्थिती लावली आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने गुरप्रितकौर सोडी यांची निवड ११ सप्टेंबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत करण्यात आली.सोडी यांना आपल्या निवडीचा हा आनंद जास्त काळ टिकवता आला नाही. कारण, पक्षाच्याच वैशाली मिलिंद देशमुख आणि दीपकसिंह रावत यांनी सोडी यांच्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान दिले. या प्रकरणात विरोधी पक्षनेत्या गुरप्रितकौर सोडी यांच्यासह महापौर, मनपा प्रशासन यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. १२ आॅक्टोबर रोजी म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे. एकूणच बोटावर मोजण्याइतक्या नगरसेवकांना एकत्रित बांधून ठेवण्यात भाजपा वर्षभरातच अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.
बोटावर मोजण्याएवढेच संख्याबळ तरीही लाथाळ्या
महापालिकेत इन-मीन सहा नगरसेवक असलेल्या भाजपा नगरसेवकांचा हा वाद पक्षपातळीवर कळाल्यानंतर तो मिटवण्यासाठी पक्षाने मराठवाडा संघटक भाऊसाहेब देशमुख यांना बुधवारी नांदेडात पाठवले. देशमुख यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षनेत्या गुरप्रितकौर सोडी आणि अन्य पाच नगरसेवकांची बाजू देशमुख यांनी विश्रामगृहात रात्री उशिरा ऐकूण घेतली. देशमुख यांनी दोन्ही बाजू ऐकून घेत सामंजस्याने वाट काढण्याचा सल्ला दिला. त्याचवेळी न्यायालयीन प्रक्रियेबाबत सूचना केली. आगामी काळात वाद सार्वजनिक न करण्याबाबतही त्यांनी ताकीद दिली.