८ लाख रुपये घेऊन ३० लाखांच्या डोनेशनच्या नावाखाली दिले कोरे कागद, दोघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2022 07:36 PM2022-05-09T19:36:40+5:302022-05-09T19:38:16+5:30
गोंदिया येथील संस्था चालक महिलेची नांदेड येथे फसवणूक
नांदेड: शैक्षणिक संस्थेच्या बांधकामाकरिता डोनेशन मिळवून देतो, असे सांगून महिला संचालिकेकडून ८ लाख रुपये घेत दोन आरोपींनी दोन पाचशेच्या नोटांखाली वह्या ठेवलेलले बंडल ३० लाख रुपये असल्याचे सांगून फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी दोन्ही आरोपींना उदगीर येथून मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनगर ता.गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्त्या तसेच शैक्षणिक संस्थेच्या संचालिका सुनंदा महेंद्र रामटेके यांना अशोक पाटील नावाच्या व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क केला. दरम्यान, आरोपी अशोक पाटील या नावाच्या व्यक्तीने गोंदिया येथील शैक्षणिक संस्था संचालिका सुनंदा रामटेके यांना तुमच्या शैक्षणिक संस्थेच्या बांधकामासाठी डोनेशन मिळवून देतो,त्यासाठी ८ लाख रुपये लागतील असे सांगितले.
काही दिवसांनी सुनंदा रामटेके यांनी अशोक पाटीलला नागपूरला भेटण्यास सांगितले. मात्र, आरोपी अशोक पाटील नावाच्या व्यक्तीनी गोंदिया येथून नागपूरपेक्षा नांदेड कमी अंतरावर असल्याचे सांगून रामटेके यांना नांदेडला बोलावले. ३० लाख रूपयांचे डोनेशन मिळेल, या आमिषापोटी रामटेके २६ एप्रिल रोजी दुपारी दिड ते पावणेदोनच्यादरम्यान नांदेड येथे पोहचल्या. येथील शासकीय रूग्णालयासमोर त्यांची अशोक पाटील व अन्य एकासोबत भेट झाली.
ठरल्याप्रमाणे रामटेके यांनी पाटीलकडे ८ लाख रुपये दिले. तर पाटील याने रामटेके यांना एक बॉक्स सोपवत यात ३० लाख रुपये असल्याचे सांगितले. मात्र, त्यात केवळ वरून लावलेल्या चार ५०० रुपयांच्या नोटा आढळून आल्या तर आत वह्यांचे बंडल होते. यावरून सुनंदा रामटेके यांनी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे आणि पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. महेश कोरे, पोउपनि. विजय पाटील, पोलीस नाईक सुनील गटलेवार यांनी २ मे रोजी उदगीर येथून केरबा यादव काकडे उर्फ अशोक पाटील (वय-३४, रा. पिंपर ता. उदगीर जि. लातूर, ह.मु. 'शिक्षक' कॉलनी, उदगीर) व अविनाश अशोकराव सूर्यवंशी (वय-३३ वर्षे, रा. अंबिका कॉलनी, चंद्रमादेवीनगर, उदगीर जि. लातूर) या आरोपींना ताब्यात घेतले. फिर्यादीकडून ओळख पटेपर्यंत दोन्ही आरोपींच्या अटकेची तसेच पोलीस कोठडीचीही माहिती आजपर्यंत दिली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.