रक्ताच्या नात्याला गालबोट; जुन्या वादातून मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 02:38 PM2021-07-07T14:38:13+5:302021-07-07T14:39:57+5:30
man killed younger brother in old dispute : रक्ताच्या नात्याला हादरा देणारी धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव म.येथे घडली आहे.
अर्धापूर (नांदेड ) : तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे जुन्या भांडणातून मोठ्या भावाने लहान भावावर चाकूने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी भावास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी जी. जी. रांजनकर, पोलिस निरीक्षक अशोक जाधव यांनीही भेट दिली व पुढील तपासा बाबात सूचना केल्या.
दि.६ जुलै मंगळावर रोजी सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील दिगंबर अमृतर कल्याणकर वय ४८ वर्ष यांनी जुन्या भांडणाचा राग मनात ठेवत छोटा भाऊ अनिल दिगंबर कल्याणकर वय ४५ याला घराजवळील रस्त्यावर आडवले व मागच्या भांडणावरून वाद सुरु केला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि दिगंबरने भावावर चाकूचे वार केले. यामध्ये जखमी होऊन रक्तबंबाळ झालेला लहान भाऊ अनिल हा जागीच ठार झाला.
अर्धापूर पोलिसांनी रात्रीच आरोपीला ताब्यात घेतले. मयताचा मुलगा अमोल अनिल कल्याणकर याच्या फिर्यादीवरून दिगंबर कल्याणकर यांच्याविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे हे करीत आहे.