बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 12:19 AM2019-01-06T00:19:40+5:302019-01-06T00:20:43+5:30
तीन महिन्यांपासून घरातून निघून गेलेल्या मनोरूग्ण महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
श्रीक्षेत्र माहूर : तीन महिन्यांपासून घरातून निघून गेलेल्या मनोरूग्ण महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला असून मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून सिंदखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
माहूर तालुक्यातील मौजे गोकुळ गोंडेगाव तांडा येथील ज्योती प्रल्हाद पवार (वय २४) या महिलेचा सिंदगी मोहपूर येथील एकाशी विवाह झाला होता. परंतु, ज्योती ही मनोरूग्ण असल्याकारणाने वैवाहिक स्थिती फार काळ टिकू शकली नव्हती. परिणामी मागील दोन वर्षांपूर्वी तिची फारकत होवून ती गोकुळ गोंडेगाव तांडा येथे पित्याकडेच राहत होती. दरम्यान, मागील दोन वर्षांच्या काळात यापूवीर्ही ती दोनवेळा घरातील लोकांना काहीही न सांगता निघून गेली होती. तसेच एक दोन दिवसांत ती परतही आली होती. परंतु, २७ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास निघून गेलेली ज्योती परत घरी न आल्याने तिचा भाऊ पंकज प्रल्हाद पवार याने २९ सप्टेंबर २०१८ रोजी सिंदखेड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद केली होती. परंतु, तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नव्हता.
४ जानेवारी रोजी गोकुळ ते सायफळ रोडपासून अंदाजे १ कि.मी. अंतरावर घनदाट जंगलात ज्योतीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह स्थानिक गुराख्यांच्या नजरेस पडला. सदरची बाब गोकुळचे पोलीस पाटील अमोल सोळंखे यांना सांगून त्याची माहिती सिंदखेड पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावरच वाई बाजार प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. अकोले यांनी शवविच्छेदन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मनोरूग्ण असलेली महिला निर्जनस्थळी स्वत:हून गेली का इतर अजून काय ? याचा अधिक तपास सपोनि मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे.पो.कॉ हेमंत मडावी हे करीत आहेत.