बोले सो निहाल, सत्श्री अकालचा जयघोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:39 AM2019-01-14T00:39:30+5:302019-01-14T00:40:53+5:30
शीख पंथाचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या ३५२ व्या जयंतीनिमित्त रविवारी शहरातून ‘बोले सो निहाल, सत्श्री अकाल’च्या जयघोषात नगरकीर्तन काढण्यात आले़
नांदेड : शीख पंथाचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या ३५२ व्या जयंतीनिमित्त रविवारी शहरातून ‘बोले सो निहाल, सत्श्री अकाल’च्या जयघोषात नगरकीर्तन काढण्यात आले़ या नगरकीर्तनात देश-विदेशातून आलेल्या हजारो भाविकांनी सहभाग घेतला़
श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पहाटे दोन वाजेपासून सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या़ दिवसभर भाविकांची गर्दी होती़ प्रकाशोत्सवानंतर हुकूमनामा घेऊन साखी सुनावण्यात आली़ त्यानंतर दुपारी चार वाजता सचखंड गुरुद्वारा येथे अरदास केल्यानंतर नगरकीर्तनाला सुरुवात करण्यात आली़ त्यात श्री गुरु ग्रंथसाहिबजी, निशाणसाहिब, गुरु महाराजांचे घोडे, कीर्तनी जत्थे, भजनी मंडळे यांचा सहभाग होता़ गुरुद्वारा गेट क्रमांक १ पासून निघालेले नगरकीर्तन गुरुद्वारा चौरस्ता, वजिराबाद, मुथा चौक, शिवाजी पुतळा, चिखलवाडी कॉर्नर मार्गे रात्री गुुरुद्वारा येथे पोहचल्यानंतर विसर्जित करण्यात आले़ त्यानंतर फटाक्यांची आकर्षक आतषबाजी करण्यात आली़ नगरकीर्तनाचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले़ सचखंड गुरुद्वारा परिसरात आकर्षक रोषणाई केली होती़ त्याचबरोबर फुलांनी सजविण्यात आले होते़ गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदरसिंघ वाधवा म्हणाले, पहाटे दोन वाजता प्रकाशपूरब कार्यक्रम घेण्यात आला़ यादरम्यान, कथा, प्रवचन, पूजापाठ करण्यात आला़ पहाटे अडीच वाजता मुख्य जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांनी अरदास केल्यानंतर प्रकाश उत्सवाला सुरुवात झाली़ नगरकीर्तनात सहभागी श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांना समर्पित घोड्यांची चाल प्रत्येकाचे लक्ष आकर्षित करीत होती़ ठिकठिकाणी घोड्यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती़
- श्री गुरु गोविंदसिंहजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सचखंड गुुरुद्वारा येथे विशेष कीर्तन दरबारचे आयोजन करण्यात आले होते़ रात्री नऊ वाजता सुरु झालेला कीर्तन दरबार रात्री दीड वाजेपर्यंत होता़ पहाटे दोन वाजता धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली़