माळेगाव यात्रेत बॉम्बे डान्सला बंदी; नांदेड पोलिस अधीक्षकांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 05:38 PM2017-12-12T17:38:55+5:302017-12-12T17:40:58+5:30
माळेगाव यात्रेतील नेहमी वादग्रस्त ठरत असलेल्या बॉम्बे डान्सला नांदेड पोलिस प्रशासनाकडून पुन्हा परवानगी नाकारण्यात आली. यामुळे यात्रेकरूंचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.
माळाकोळी (नांदेड) : माळेगाव यात्रेतील नेहमी वादग्रस्त ठरत असलेल्या बॉम्बे डान्सला नांदेड पोलिस प्रशासनाकडून पुन्हा परवानगी नाकारण्यात आली. यामुळे यात्रेकरूंचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.
दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या खंडेरायाची माळेगाव यात्रा ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा असून १६ डिसेंबरपासून यळकोट-येळकोट जयमल्हारच्या जयघोषात पालखी व शासकीय पूजेने यात्रेला सुरूवात होत आहे. यात्रेमध्ये यात्रेकरु, व्यापारी मोठ्या प्रमाणात डेरेदाखल झाले असून यात्रेची जयत तयारी चालू असताना पुन्हा पोलिस प्रशासनाकडून माळेगाव यात्रेचे मुख्य आर्कषण असलेल्या बॉम्बे-डान्सला परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सूत्राकडून मिळाली आहे.
माळेगाव यात्रा ग्रामिण भागातील यात्रा असल्यामुळे या ठिकाणी हवसे-नवसे-गवसे यात्रेत हजेरी लावतात. खंडेरायाच्या यात्रेत घोडेबाजार, गाढवांचा बाजार, तमासे, लावणी महोत्सव, कलामहोत्सवा सोबतच तरुणांची हौस म्हणून मुख्य आर्कषण बॉम्बे डान्स बनले आहे. यामुळे यात्रेत यात्रेकरु मोठ्या प्रमाणात येतात़ मात्र गेल्या पाच वर्षापासून बॉम्बे-डान्स तक्रारीचा विषय बनला असून पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था पुढे करत डान्सला परवानगी नाकारत आहे.पाच वर्षापूर्वी बंद करण्यात आलेल्या बाँम्बे डान्सला मागील दोन वर्ष परवानगी देण्यात आली होती़ मात्र या वर्षी पुन्हा माळेगाव यात्रेतील बॉम्बे डान्सला पोलिस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्यामुळे यात्रेकरुंचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसून येत आहे.