बेवारस बॅगमुळे शहरात बॉम्बची अफवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:00 AM2017-12-13T01:00:06+5:302017-12-13T01:00:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड:शहरातील वजिराबादच्या मुख्य चौकात असलेल्या वैभव लॉजमध्ये थांबलेल्या आफ्रिकन युवकाच्या खोलीत वायरचा गुंता असलेली एक गूढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:शहरातील वजिराबादच्या मुख्य चौकात असलेल्या वैभव लॉजमध्ये थांबलेल्या आफ्रिकन युवकाच्या खोलीत वायरचा गुंता असलेली एक गूढ वस्तू असलेली बॅग सापडल्याने खळबळ उडाली़ बॉम्बशोधक व नाशक पथकाने बॅगेतील त्या वस्तूची तपासणी केली असता सदर वस्तू इलेक्ट्रॉनिक असल्याचे स्पष्ट झाले़, परंतु दोन दिवसांपासून खोलीत थांबलेला तो आफ्रिकन युवक परत न आल्यामुळे संशय बळावला होता़
पोलीस अधीक्षक कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वैभव लॉजमध्ये १० डिसेंबर रोजी आकेश केनेर इंग्राको हा युवक आला होता़ खोली क्रमांक २७ मध्ये त्या दिवशी त्याने रात्रभर मुक्कामही केला़ त्यानंतर ११ डिसेंबरच्या सकाळी तो खोलीतून बाहेर पडला़, परंतु गेले दोन दिवस तो परत आलाच नाही़ मंगळवारी सायंकाळी झाडझूड करण्यासाठी गेलेल्या लॉजच्या कामगाराला खोलीत बॅग असल्याचे आढळून आले़ त्याने बॅगची चेन उघडून पाहिली असता, त्यामध्ये वायरचा गुंता एकमेकांना टेपद्वारे जोडल्याचे त्याला दिसून आले़ ही बाब कामगाराने त्वरित लॉज मालकाला कळविली़ त्यानंतर वजिराबादचे पोनि़ प्रदीप काकडे घटनास्थळी आले़
यावेळी बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले़ श्वानपथकाने बॅगमध्ये काही स्फोटक पदार्थ असल्याचे संकेत दिले नाही़ परंतु तोपर्यंत परिसरात बॉम्बची अफवा उडाली होती़ लॉजबाहेर नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती़ बॉम्बशोधक पथकाने बॅग ताब्यात घेवून तपासणीसाठी फायर बटवर नेली़ या ठिकाणी जवळपास दोन तास बॉम्बशोधक पथकाचे कर्मचारी त्या वस्तूची तपासणी करीत होते़ सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला होता़ तपासणीनंतर केवळ इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे सर्वांचाच जीव भांड्यात पडला़ परंतु लॉजवर थांबलेला आफ्रिकन युवक नेमका गेला कुठे? याचे गूढ कायम आहे़
४१० डिसेंबर रोजी वैभव लॉजवर आला होता आफ्रिकन युवक
४रात्रभर मुक्कामानंतर ११ रोजी तो पडला बाहेर
४ती वस्तू इलेक्ट्रॉनिकची