माणूसभर उंचीच्या कपाशीला बोंडे नगण्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:03 PM2019-11-25T13:03:08+5:302019-11-25T13:05:13+5:30
शेतक-यांना यावर्षी उत्पादन खर्चही भरुन निघेल किंवा नाही, असा प्रश्न भेडसावत आहे.
बिलोली : शेतात उंचच उंच वाढलेल्या कपाशीत प्रवेश केल्यानंतर माणुसही दिसणार नाही, असे चित्र दिसत़ ८० ते ९० बोंड असतील आणि २० क्विंटल उत्पादन होईल अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची मात्र घोर निराशा झाली आहे़ एवढी वाढ होवूनही या कपाशीला मोजकेच बोंडे लागली आहेत़
बहुतांश ठिकाणी उंच वाढलेल्या कपाशीला मोजकीच बोंड असून काही ठिकाणी ना कपाशी वाढली ना बोंडाची संख्या वाढली, अशी परिस्थिती आहे.त्यामुळे शेतक-यांना माञ यावर्षी उत्पादन खर्चही भरुन निघेल किंवा नाही, असा प्रश्न भेडसावत आहे.
यावर्षी सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी जेरीस आले आहेत़ सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे शेतक-यांचे नुकसान झाले होते. त्यानंतर जवळपास दीड महिना सातत्यपुर्ण पाऊस झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. परतीच्या पावसानेही जाता जाता शेतक-यांना दणका दिला. मध्यंतरीच्या काळात काही भागात कपाशीचे पीक जोमाने वाढले. हिरवीकच उंचच उंच वाढलेली आणि दाटीवाटीने बहरलेली कपाशी पाहून कुणालाही एकरी १५ ते १६ क्विंटल उत्पन्न होईल, असाच भास होतो. पण, कपाशीत गेल्यानंतर माञ परिस्थिती वेगळीच दिसते. उंच वाढलेल्या कपाशीला केवळ दहा ते पंधरा बोंड आहे, नव्याने पाती नावालाच आहे. त्यामुळे उत्पादनात प्रचंड घट असुन निम्मेही उत्पादन होईल किंवा नाही, याबाबत शेतक-यांना शंका आहे. त्यात अत्यल्प अनुदानानेही निराशा केली आहे़
सरसकट मदत देण्याची गरज
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीनचे उत्पादन घटले आहे.प्रशासनाने आणेवारी कोणत्या पध्दतीने काढली ते कळायला मार्ग नाही. शेतक-यांना सरसकट मदत देण्याची गरज आहे असे बिलोली तालुक्यातल्या असंख्य शेतक-यांनी केली आहे.कधी अधिक फरकाने सर्वच शेतक-यांची परिस्थिती सारखी आहे. काहींच्या शेतातील कपाशी तीन ते चार फुटांच्या वर वाढलेली नाही. या कपाशीलाही कुठे दोन,कुठे तीन तर कुठे जास्तीत जास्त दहा ते पंधरा बोंड आहेत.त्यामुळे सर्वञच कपाशीच्या उत्पन्नाबाबत विदारक परिस्थिती आहे.
हे नुकसान कुठुन भरुन काढणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या आणेवारीत सुबत्ता दाखविली आहे. पण, ही सुबत्ता कुठे दिसली, हा प्रश्नच आहे. एका शेतक-यांच्या शेतातील परिस्थिती चांगली असली तर दुस-या शेतात तिच परिस्थिती राहील, याची शाश्वती नसते. त्यामुळे उत्पादनही सारखे राहत नाही़
माझ्या ४ एकर शेतात कपाशीचे पीक असून ते केवळ ७ फुट उंच वाढले परंतु अल्प बोंड असल्यामुळे याचा चांगला फटका बसणार असून शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे
-हानमंतु यंबडवार, शेतकरी बिलोली़