बालभारतीकडून पुस्तके रवाना; शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचा सेट विद्यार्थ्यांना मिळणार
By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: May 17, 2024 06:50 PM2024-05-17T18:50:04+5:302024-05-17T18:51:20+5:30
शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात.
नांदेड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या जिल्ह्यातील तब्बल ३ लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तके हातात पडतील, असे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शासकीय, आश्रमशाळा, खासगी अनुदानित शाळा तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाठ्यपुस्तके वितरित केली जातात. यंदाही शाळेच्या पहिल्या दिवशी म्हणजे १५ जूनला पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पडावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे १ लाख ८० हजार ३३६ इतके विद्यार्थी आहेत, तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतचे १ लाख १७ हजार ७७४ विद्यार्थी संख्या आहे. अशी एकूण मिळून २ लाख ९८ हजार ११० विद्यार्थी संख्या आहे. सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वेळेवर मिळण्यासाठी नियोजन असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सविता बिरगे यांनी सांगितले. यावर्षी एकात्मिक स्वरूपात पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. एकाच संचामध्ये इंग्रजी, गणित यासह इतर विषय असणार आहेत. ही पुस्तके इंग्रजी माध्यमाच्या स्वंयअर्थसाहाय्यित शाळा सोडून इतर सर्व शाळांना वितरित केली जातील.
पाठ्यपुस्तकांसाठी १० कोटी ६७ लाखांची तरतूद
जिल्ह्यात पहिली ते पाचवीसाठी १ लाख ४३ हजार ४९२ पुस्तकांचा संच तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत १ लाख ३६ हजार ९७५ पुस्तकांचे एकात्मिक संच लागणार आहेत. यासाठी शासनाकडून १० कोटी ६७ लाख १५ हजार २३५ रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या
इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतची तालुकानिहाय विद्यार्थी संख्या अशी-
बिलोली ८६३९ विद्यार्थी, धर्माबाद ६६५२, नायगाव १०,४२५, देगलूर १२,६२७, नांदेड १०४५५, अर्धापूर ७३०५, मुदखेड ७७२७, किनवट १७१३४, माहूर ७७००, हदगाव १८२०८, हिमायतनगर ७२१०, मुखेड १८८२६, भोकर १० हजार ४०, उमरी ७३४२, कंधार १५३०६, लोहा १६२६० याप्रमाणे १ लाख ८० हजार ३३६ प्राथमिकची तर १ लाख १७ हजार ७७४ इयत्ता सहावी ते आठवीची विद्यार्थी संख्या आहे.
बालभारतीकडून नांदेडला रवाना
पाठ्यपुस्तकाचे संच लातूर येथील बालभारती कार्यालयातून नांदेड जिल्ह्यासाठी रवाना करण्यात आले आहेत. सदर पाठ्यपुस्तके वजिराबाद येथील मल्टिपर्पज हायस्कूलमध्ये उतरली जाणार आहेत. त्यानंतर पुस्तकांचे तालुकास्तरावर प्रत्येक शाळेत वाटप करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.