बोरगाव तेलंग ग्रामपंचायत गावकऱ्यांच्या सहकार्याने बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:53 AM2021-01-08T04:53:36+5:302021-01-08T04:53:36+5:30
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जोराने सुरू आहेत. गावातील सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता जपत, लोकशाहीला बळकटी देण्यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायती बिनविरोध ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जोराने सुरू आहेत. गावातील सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता जपत, लोकशाहीला बळकटी देण्यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायती बिनविरोध काढाव्यात, असे आवाहन करण्यात आले होते. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नांदेड तालुक्यातील बोरगाव तेलंग येथील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय घेतला. गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि राजकारणातील सक्रिय कार्यकर्त्यांनी या बैठकीत उपस्थिती लावून ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष मधुकरराव क्षीरसागर, पोलीस पाटील आनंदराव क्षीरसागर, केशवराव क्षीरसागर, बालाजी क्षीरसागर, सुनील क्षीरसागर, उद्धव क्षीरसागर, रामजी क्षीरसागर, संतोष क्षीरसागर, गजानन क्षीरसागर, गोपाळ क्षीरसागर, मनोज क्षीरसागर, गणेश क्षीरसागर, गंगाधर क्षीरसागर, चांदू क्षीरसागर, भारत क्षीरसागर, शिवाजी क्षीरसागर, रतनबुवा पुरी, गणेश पुरी, दिलीप कंधारे, गंगाधर कंधारे, माधव कंधारे, गुरुदास कंधारे, केशव कंधारे, नागोराव निवडगे, भारत सावंत आदींची यावेळी उपस्थिती होती.
दिशा समितीचे सदस्य तथा सलग दोन वेळा बोरगाव तेलंग ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले अनिल पाटील बोरगावकर यांनी याहीवेळी बाजी मारली असून, त्यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे.
गावचा विकास आणि मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून बोरगाव ग्रामपंचायत विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम अनिल पाटील बोरगावकर यांनी केले आहे. तालुक्यातील पहिली हगणदारीमुक्त ग्रामपंचायत म्हणूनही बोरगावला त्यांनी सन्मान मिळवून दिला होता. त्यांच्या सामाजिक कामाची पावती म्हणून ग्रामस्थांनी पुन्हा अनिल पाटील बोरगावकर यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला आहे. बिनविरोध ग्रामपंचायत काढल्यामुळे बोरगाव ग्रामस्थांचे विविध क्षेत्रांतून कौतुक होत आहे.