प्रशासनाच्या अभिनंदनासह बीओटी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:15 AM2018-12-01T00:15:16+5:302018-12-01T00:16:49+5:30
शहराच्या विकासात भर पाडणारा बीओटी प्रोजेक्ट सभागृहापुढे ठेवला असून यापूर्वी २ कोटी रुपये प्रिमीयम मिळाला असताना तब्बल ३ कोटींचा जादा प्रिमीयम मिळवून देत महापालिकेचे उत्पन्न वाढविल्यामुळे प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव करत शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बीओटीसह १३ प्रस्ताव पास-पासच्या गजरात मंजूर करण्यात आले.
नांदेड : शहराच्या विकासात भर पाडणारा बीओटी प्रोजेक्ट सभागृहापुढे ठेवला असून यापूर्वी २ कोटी रुपये प्रिमीयम मिळाला असताना तब्बल ३ कोटींचा जादा प्रिमीयम मिळवून देत महापालिकेचे उत्पन्न वाढविल्यामुळे प्रशासनाच्या अभिनंदनाचा ठराव करत शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत बीओटीसह १३ प्रस्ताव पास-पासच्या गजरात मंजूर करण्यात आले.
महापौर शीलाताई भवरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी शहरातील वजिराबाद भागातील तरोडेकर मार्केटचा बीओटीच्या तत्त्वावर विकास करण्याची निविदा तसेच अन्य १२ प्र्रस्ताव ठेवण्यात आले. हे प्रस्ताव कोणत्याही चर्चेविना पास-पासच्या गजरात मंजूर करण्यात आले. बीओटी विषयावर सभागृहात बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या महेश कनकदंडे यांनाही सभागृहात इतर सदस्यांनी शांत केले. आवश्यक ती माहिती लेखी स्वरुपात कनकदंडे यांना द्यावी, अशी टिप्पणी करत त्यांना शांत करण्यात आले. त्याचवेळी या प्रस्तावाबद्दल माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. दरम्यान, व्यंकटराव तरोडेकर मार्केटचे नाव बदलू नये, अशी मागणी नगरसेवक सतीश देशमुख यांनी केली. तब्बल ३ कोटींचे जादा उत्पन्न महापालिकेला प्राप्त झाले आहे. त्याचवेळी हा प्रोजेक्ट शहराच्या विकासात भरच पाडणार असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, सभेच्या प्रारंभी मराठा आरक्षण मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव विरोधी पक्षनेत्या गुरुप्रितकौर सोडी, बालाजी कल्याणकर, दीपक रावत यांनी ठेवला. या प्र्रस्तावावर सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, उपमहापौर विनय गिरडे, माजी महापौर अब्दुल सत्तार, शेर अली आदींनी पाठिंबा दिला. त्याचवेळी ४० बळीनंतर हे आरक्षण मिळाले असल्याचे सांगत याबरोबरच मुस्लिम आणि धनगर आरक्षणाचाही प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली.
पाणीप्रश्नासंदर्भात आ. हेमंत पाटील यांनी खा. चव्हाणांवर आरोप केल्याप्रकरणी सभागृहात हेमंत पाटील यांचा निषेध करण्यात आला. शहरवासियांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना केवळ राजकारणासाठी वेगवेगळ्या घोषणा करुन ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये वाद निर्माण केला जात असल्याचेही अब्दुल सत्तार म्हणाले. बापूराव गजभारे यांनीही हेमंत पाटील यांच्यासह आ. प्रताप पाटील यांच्या पाणीविषयक भूमिकेचा निषेध केला. शेतकºयांना पाणी मिळणे आवश्यक आहे. त्याचवेळी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणेही आवश्यक असल्याचे गजभारे म्हणाले. एकीकडे पाणीप्रश्न गंभीर होत असतानाच शहरात मात्र मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती व पाण्याचा अपव्यय सुरु असल्याचा मुद्दा किशोर स्वामी यांनी मांडला. पाणी नियोजनाबाबत माहिती देण्याची मागणीही त्यांनी केली. शहरात अनेक भागात पाणी वाया जात असल्याचा ठराव संगीता डक, दीपक रावत यांनी मांडला.
पाण्याच्या नियोजनाबाबत आयुक्त लहुराज माळी यांनी विष्णूपुरी प्रकल्पातील पाणीचोरी प्रकरणात जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे ते म्हणाले. पाणी पथकालाही सक्रिय होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज लावण्यात आले असून याकडे दुुर्लक्ष का करण्यात येत आहे ? या प्रकरणात क्षेत्रीय अधिकाºयांची जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी सभागृह नेते गाडीवाले यांनी केली. शहरातील विविध भागातील अनधिकृत बॅनर, होर्डिंग्जचे छायाचित्र आयुक्तांकडे सादर केले. या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश अधिकाºयांना दिले. शहरात कच-याचे विलगीकरण न करता कचरा उचलला जात असताना नागरिकांवर मात्र कारवाईचा इशारा दिला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या सोडी यांनी केला.
कचरा विलगीकरणाची व्यवस्था ठेकेदाराने केली नसल्याचे त्या म्हणाल्या. वजिराबाद भागात एका महिला मजुराचा मृत्यू झाला. या प्रकरणात प्रशासनाने काय कारवाई केली ? असा सवाल उपस्थित केला. या प्रश्नावर सदर महिला मजुराच्या मृत्यूबाबत माहिती प्रशासनाकडे नसल्याचे स्वच्छता विभागाच्या उपायुक्त गीता ठाकरे यांनी सांगितले. त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी संतप्त भावना व्यक्त करत मजुराच्या मृत्यूनंतर प्रशासन कारवाई करत नाही, ही बाब गंभीर असल्याचे सांगितले. पथदिव्यांचा विषयही ऐरणीवर आला होता. अनेक भागात अंधार आहे. निवडून येऊन वर्ष झाले तरी हा प्रश्नही नगरसेवक सोडवू शकले नाहीत. प्रभागातील नागरिक आमच्याकडे येत असून त्यांना काय उत्तर द्यायचे, अशी विचारणा ज्योती कल्याणकर यांनी केली. सिडको भागातही अंधार असल्याचे बेबीताई गुपिले यांनी तर तरोडा भागातील पथदिव्यांचा प्रश्न सतीश देशमुख यांनी मांडला. कौठा भागात कोणत्याही सुविधा नसून प्रशासन कधी लक्ष देणार, अशी विचारणा शांताबाई गोरे यांनी केली.
- स्थायी समितीची शुक्रवारी सकाळी ११ वाजता होणारी सभा अचानक पुढे ढकलण्यात आली. ही सभा आता शनिवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. दलित वस्ती निधीच्या कामांना मंजुरीचे प्रस्ताव सभेपुढे आहेत. बीओटीच्या विषयावरुन स्थायी समितीने आपल्या अधिकाराचा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांनी चुप्पीच साधली होती. शनिवारी होणा-या सभेत बीओटीवर चर्चा होईल का ? हा प्रश्न पुढे आला आहे. निवृत्त झालेल्या आठ सदस्यांची ही शेवटची बैठक राहणार आहे.