वरून माशांचे तर त्याखाली गुटख्याचे बॉक्स; पोलीस कारवाईत गुटख्याचा मोठा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:50 PM2020-07-02T20:50:00+5:302020-07-02T20:50:48+5:30
कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात विविध मार्गाने नवनवीन शक्कल लढवून गुटख्याची तस्करी केली जाते.
मरखेल (जि. नांदेड) : वरून माशांचे बॉक्स व त्याखाली गुटख्याचे बॉक्स घेऊन जाणारे चारचाकी वाहन हणेगावहून देगलूरच्या दिशेने निघाले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी पाळत ठेवून हे वाहन पकडले असता, त्यात माशांच्या बॉक्सच्या खाली प्रतिबंधित असलेल्या नामांकित कंपनीचा गुटखा आढळून आला. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी या वाहनासह (एम़एच़२६-बी़ई़५६१०) त्यातील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध मरखेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविला. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. यात १ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा गुटखा व चार लाख रुपये किमतीची व्हॅन असा एकूण ५ लाख ९४ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सदर वाहन पोलीस ठाण्यामध्ये लावण्यात आले.
कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात विविध मार्गाने नवनवीन शक्कल लढवून गुटख्याची तस्करी केली जाते. किराणा सामान व भाजीपाला वाहतूक करणाऱ्या वाहनांतून मोठ्या प्रमाणात गुटखा वितरित केला जात होता. खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत चालक मधुकर रमण मुधोळकर (रा.शांतीनगर, इतवारा नांदेड ) व मालक वहाज शेख सिराज (रा.पूर्णा) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोघांनाही ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.