'मुलाला कॅनडात नोकरी लावतो'; महिलेकडून तिघांनी ३१ लाख उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 03:25 PM2021-08-13T15:25:40+5:302021-08-13T15:30:14+5:30
मुलाकडे बनावट पासपोर्ट आणि व्हिसा आढळल्याने कंबोडीयात त्याला अडविले
नांदेड- मुलाला कॅनडात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका महिलेला ३१ लाख रुपयांनी गंडविले आहे. गुरुद्वारा लंगर साहिब येथे सेवा करताना या महिलेची कॅनडातील तिघांशी ओळख झाली होती. या प्रकरणात आता वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
मुंबईच्या कळंबोली येथील जगदीपकौर हरपासलिसंग संधू या गृहिणी नांदेडच्या लंगर साहिब जवळ राहतात. लंगर साहिब येथे सेवा करताना त्यांची ओळख रणजिसिंघ बलदेवसिंघ, दिव्या शर्मा आणि कुलवंत कौर या तिघांशी ओळख झाली. या तिघांनी जगदीपकौर यांना त्यांच्या मुलाला कॅनडात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी मुलाचा बनावट पासपोर्ट आणि व्हिसा तयार करण्यात आला.
कॅनडाला कंबोडीया मार्गे गेल्यास कमी खर्च लागतो असे सांगण्यात आले. त्यासाठी ८ ऑगस्ट २०१९ ते२० ऑगस्ट या काळात जगदीपकौर यांनी तिघांना टप्याटप्याने ३० लाख ७५ हजार रुपये दिले. त्यानंतर जगदीपकौर यांच्या मुलाला कंबोडीया मार्गे नेण्यात आले. परंतु, बनावट पासपोर्ट आणि व्हिसा असल्यामुळे कंबोडीया सरकारने त्यांना पुढे जावू दिले नाही. त्यानंतर आरोपींनी जगदीपकौर यांच्या मुलाला नांदेडला परत पाठविले. काम झाले नसल्यामुळे जगदीपकौर यांनी पैसे परत मागितले. परंतु, आरोपींनी त्यांनाच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात जगदीपकौर यांच्या तक्रारीवरुन तिघांवर गुन्हा नोंद झाला. तपास पोउपनि जाधव हे करीत आहेत.