फुटाणे विकणारा मुलगा होणार डॉक्टर!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 06:56 AM2020-11-20T06:56:14+5:302020-11-20T06:56:50+5:30
परिस्थितीशी दोन हात : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी रामप्रसादला आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट (जि. नांदेड) : घरची स्थिती हलाखीची... अठरा विश्वे दारिद्र्य... अशा परिस्थितीतही त्याने परिस्थितीशी संघर्ष करत झटून अभ्यास केला... प्रसंगी फुटाणे विकले... आणि आता त्याला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले आहे... अलीकडेच झालेल्या नीट परीक्षेत त्याला ७५० पैकी ६२५ गुण प्राप्त झाले. ‘एमबीबीएस’ या वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तो पात्र ठरला आहे... ही आहे रामप्रसाद जुनगरेची यशोगाथा!
येथील अय्यप्पास्वामी मंदिराच्या बाजूच्या वस्तीतील एका झोपडीत रामप्रसाद आई-वडिलांसोबत राहतो. जुनगरे कुटुंबाची सर्व मदार फुटाणे-बत्तासेच्या गाड्यावर. वडिलांना व्यवसायात हातभार लावत रामप्रसादने जिद्दीने दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच पूर्ण केले. पुढे ११ आणि १२वीसाठी थेट पुणे गाठले. फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना तो महापालिकेच्या वसतिगृहात रहायचा. त्याच्या अभ्यासूवृत्तीची दखल घेऊन पुण्यातील ‘लाइफ फॉर एम्प्लिमेंट’ या संस्थेने त्याला अभ्यासासाठी मार्गदर्शन तसेच मदत पुरविली. यामध्ये डॉ. अतुल ढाकणे यांचे त्याला सहकार्य मिळाले.
एमबीबीएससाठी लागणार मदतीचे हात
वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळावा यासाठी रामप्रसादला आर्थिक मदतीची गरज असल्याचे त्याच्या कुटुंबाचे म्हणणे आहे.
कष्टामुळेच त्याला हे यश मिळाले. पुण्यात शिकत असतानाही गावी आल्यावर न लाजता तो आम्हाला गाड्यावर फुटाणे विकण्यासाठी मदत करीत असे. - फकीरराव जुनगरे, वडील