संततधार पावसाने महापालिकेचे पितळ उघडे पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:31+5:302021-09-09T04:23:31+5:30
दाेन दिवसांच्या संततधार पावसाने महापालिकेची एकूणच पाेलखाेल केली आहे. तुंबलेल्या नाल्या व गटार यामुळे पावसाचे पाणी पुढे निघून न ...
दाेन दिवसांच्या संततधार पावसाने महापालिकेची एकूणच पाेलखाेल केली आहे. तुंबलेल्या नाल्या व गटार यामुळे पावसाचे पाणी पुढे निघून न जाता जागीच थांबले. त्यामुळे नाल्यामधील घाण रस्त्यावर आली. शहरातील ड्रेनेजला व्यवस्थित आऊटलेट नाही, पाण्याचा निचरा हाेत नाही. त्याला लेवल नाही, हेही यातून पुढे आले. रस्त्यांवर पाण्याचे अक्षरश: तलाव साचलेले पाहायला मिळाले. शहरातील नावघाट, गाेवर्धनघाट, मुजामपेठ, इतवारा, देगलूर नाका, सिद्धार्थनगर, मंडई, करबला अशा विविध भागांमध्ये पावसाचे पाणी शिरले. घराघरात पाणी शिरल्याने गाेरगरिबांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक लाेक पुरात व पावसात अडकून पडले हाेते. जीवरक्षक कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापनाची तेवढी तत्परता दिसून आली नाही. या पुरांमध्ये काही युवक हुल्लडबाजी करतानाही पाहायला मिळाले. अखेर दासगणू पुलावर ही हुल्लडबाजी राेखण्यासाठी पाेलिसांना तैणात करावे लागले. रस्त्यावर साचलेल्या या पाण्यामुळे महापालिकेकडून नाल्यांची सफाई याेग्य पद्धतीने व नियमित हाेत नसल्याचे पुन्हा एकदा अधाेरेखित झाले. शहरातील स्मशानभूमी, धार्मिक स्थळेसुद्धा पाण्याखाली आल्याचे पाहायला मिळाले. मागास वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यानंतर तेथे तातडीने मदत पाेहाेचली नसल्याची ओरड ऐकायला मिळाली. वास्तविक महापालिकेने स्थलांतरीतांसाठी केलेली निवारा व्यवस्था व संबंधितांचे संपर्क क्रमांक समाजमाध्यमावर जाहीर केले; मात्र ते पुरात अडकलेल्यांपर्यंत पाेहाेचले नसल्याचे दिसून आले.
चाैकट....
राजकीय, शासकीय यंत्रणा आहे कुठे ?
शहरात २४ तासांतील संततधार पावसानंतर उद्भवलेली स्थिती लक्षात घेता महापालिकेतील राजकीय व शासकीय यंत्रणा मागास वस्त्यांमध्ये मदतीसाठी धावल्याचे चित्र पाहायला मिळाले नाही. त्यामुळे रहिवासी वस्त्यांमध्ये महापालिकेच्या कारभाराविराेधात आक्राेश दिसून आला. वस्त्यांमध्ये पाणी शिरले असताना महापालिकेचे अधिकारी, पदाधिकारी तिकडे फिरकले नसल्याचे सांगितले जाते.
चाैकट....
नुकसानाचे पंचनामे त्वरित करा- जिल्हाधिकारी
अतिवृष्टीमुळे गेल्या २४ तासांत जिल्ह्यात शेती, पिके, घरे, जनावरांच्या मृत्यूने माेठे नुकसान झाले असून, त्याचे तातडीने पंचनामे करावे, असा आदेश जिल्हाधिकारी डाॅ. विपीन ईटनकर यांनी दिला. बुधवारी त्यांनी सर्व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचे कृतीदल स्थापन केले आहे. पाणीसाठा, पाझर तलावांची स्थिती याचा आढावा घेण्याची जबाबदारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्यावर साेपविण्यात आली. विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष फिल्डवर जावून पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन वेळा शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीला सामाेरे जावे लागले. साेयाबीन, कापूस, ज्वारी, तूर या पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्यांच्या नुकसानाची पाहणी करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.