मराठवाड्यात दुष्काळातही लाचखोरांचा सुकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 02:43 PM2019-06-13T14:43:31+5:302019-06-13T14:46:04+5:30

सहा महिन्यांत मराठवाड्यात ११८ जण जाळ्यात 

bribe cases increased in drought affected Marathwada region | मराठवाड्यात दुष्काळातही लाचखोरांचा सुकाळ

मराठवाड्यात दुष्काळातही लाचखोरांचा सुकाळ

googlenewsNext
ठळक मुद्देवर्ग १ चे २१ अधिकारीही जाळ्यातलाचखोरीत महसूल भूमीअभिलेख पुढे

- विशाल सोनटक्के

नांदेड : पाणीटंचाईमुळे मराठवाड्यातील जनता होरपळून जात आहे़ दुसरीकडे या सर्वसामान्यांची कामे ज्या शासकीय कार्यालयात असतात, तेथे ऐन दुष्काळातही लाचखोरी जोमात असल्याचे पुढे आले आहे़ मागील सहा महिन्यांत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात लाचखोरी प्रकरणी ११८ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत़ विशेष म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे़

१ जून ते १९ जून या कालावधीत राज्यातील ८ परीक्षेत्रात ३९३ सापळे रचण्यात आले़ यात ५२२ शासकीय अधिकारी-कर्मचारी जाळ्यात सापडले़ याबरोबरच अपसंपदेचेही ९ गुन्हे दाखल झाले असून यात १५ जण अडकले आहेत़  तर अन्य प्रकारच्या भ्रष्टाचाराचे तीन गुन्हे असून यात ६ आरोपी आहेत़ परीक्षेत्रनिहाय लाचखोरीची आकडेवारी पाहिली असता मुंबई परीक्षेत्रात मागील सहा महिन्यांत २९ आरोपीविरोधात २० गुन्हे दाखल आहेत़ ठाणे परीक्षेत्रात ६८ जणांविरोधात ४७ गुन्ह्यांची नोंद आहे़ पुणे परीक्षेत्रात ११३ लाचखोरांविरोधात ८६ गुन्हे दाखल आहेत़ नाशिक परीक्षेत्रात ६८ जणांविरोधात ४९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे़ नागपूर परीक्षेत्रात ६९ आरोपीविरोधात ५२ गुन्हे दाखल आहेत़ अमरावती परीक्षेत्रात ७८ आरोपीविरोधात ५७ गुन्ह्यांची नोंद आहे़ तर मराठवाड्यातील औरंगाबाद परीक्षेत्रात ६९ आरोपीविरोधात ५५ गुन्हे दाखल झाले असून नांदेड परीक्षेत्रात ४९ आरोपीविरोधात ३९ गुन्ह्यांची नोंद झाली आहे़ म्हणजेच मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात रचलेल्या ९३ सापळ्यात ११८ जण अडकले आहेत़  २०१८ आणि २०१९ मधील सहा महिन्यांच्या आकडेवारीची तुलना केली असता राज्यातील लाचखोरीचे प्रमाण दोन टक्क्यांनी वाढल्याचे दिसते़ विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सापळा वाढीत २०१८ च्या तुलनेत ३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ त्यानंतर मे महिन्यात ९ टक्क्यांनी लाचखोराविरूद्धचे सापळे वाढले आहेत़ तर जून महिन्याच्या पहिल्या दहाच दिवसात तब्बल २३ सापळ्यात २७ लाचखोर अडकले असून २०१८ च्या तुलनेत हे प्रमाण ७७ टक्के इतके जास्त आहे़  

लाचखोरीत महसूल भूमीअभिलेख पुढे
१ जानेवारी ते १० जून २०१९ या कालावधीत राज्यात दाखल झालेली लाचखोरीची सर्वाधिक  ९४ प्रकरणे महसूल भूमीअभिलेख आणि नोंदणी विभागाशी संबंधित आहेत़ तर त्या पाठोपाठ पोलिस प्रशासन आहे़ ८० प्रकरणांत पोलिसांवर गुन्हे दाखल झाले असून यात ५ वर्ग १ चे अधिकारी आहेत़ पंचायत समितीशी संबंधित ३५, महानगर पालिका २५, जिल्हा परिषद २४, विद्युत वितरण कंपनी १७ आणि वनविभागाशी संबंधित ११ प्रकरणात लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत़ यात शिक्षण आणि सहकार विभागही मागे नाही़ सहकार विभागाशी संबंधित १० तर शिक्षण विभागाचेही अधिकारी १२ प्रकरणांत लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत़

वर्ग १ चे २१ अधिकारीही जाळ्यात
सरत्या सहा महिन्यांत राज्यात लाचखोरीची ३९३ प्रकरणे दाखल झाली आहेत़ यात वर्ग १ च्या २१ अधिकाऱ्याविरूद्ध गुन्हे दाखल झाले असून वर्ग २ चे ४४ अधिकारीही लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत़ वर्ग ३ चे सर्वाधिक म्हणजे ३१० कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कचाट्यात सापडले असून वर्ग ४ च्या २२ कर्मचाऱ्यावरही लाचखोरीप्रकरणी गुन्ह्यांची नोंद झाली आहे़ याबरोबरच इतर ४० लोकसेवक आणि ८५ खाजगी व्यक्तीविरोधातही गुन्हे दाखल आहेत़ याच कालावधीत अपसंपदेची ९ प्रकरणे दाखल झाली आहेत़ यामध्ये पोलिस, महानगरपालिका, जिल्हा परिषद, प्रादेशिक परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम आणि सहकार विभागातील प्रत्येकी दोन प्रकरणांत गुन्ह्यांची नोंद झाली आहे़ 

Web Title: bribe cases increased in drought affected Marathwada region

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.