स्ट्रक्चरल ऑडीट न केल्याने पूल कोसळला; दुर्घटनेसाठी सरकार जबाबदार असल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 05:51 PM2019-03-15T17:51:43+5:302019-03-15T17:52:44+5:30
एल्फीन्स्टनच्या घटनेनंतरही राज्य सरकारने केले दुर्लक्ष
नांदेड : एल्फिन्स्टन येथील घटनेनंतर राज्य सरकारने मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचे आश्वासन दिले होते़ परंतु मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि राज्य शासन या दोघांनीही याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे वारंवार पुल कोसळण्याच्या घटना घडत आहेत़ स्ट्रॅक्चरल ऑडीट न झाल्यामुळेच अशा घटना घडत असून याला सर्वस्वी शिवसेना आणि भाजपाचे सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे़
शुक्रवारी नांदेड विमानतळावर आले असताना मुंडे यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़ यावेळी मुंडे म्हणाले, आम्ही सभागृहात आणि सभागृहाबाहेरही मुंबईतील सर्व पादचारी पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याची मागणी केली होती़ एल्फीन्स्टनच्या घटनेनंतर राज्य सरकारनेही सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येईल असा शब्द दिला होता़ परंतु भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारने याकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे पुल कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत़ अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मनपातील सत्ताधारी सेना आणि राज्य सरकारातील भाजपाची जबाबदारी होती़ परंतु ही दोन्ही सरकारे असंवेदनशील आहेत़ मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे़ भाजपा मुंबईत बाहेर राहून चौकीदारी करीत आहे़ मग अशा घटना घडत असताना भाजपा काय झोपा काढीत होती काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला़ मुंबईत घटना घडलेली असताना शिवसेनेचा एकही मोठा पदाधिकारी त्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेला नाही़ असेही मुंडे म्हणाले.