मराठवाड्यात बुलेट ट्रेन आणण्यासाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:07+5:302021-07-18T04:14:07+5:30
नांदेड : मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अहमदाबाद बुलेट ट्रेनला आमचा विरोध कायम आहे. परंतु अधिक वेगाने प्रवास करण्यासाठी जर ही ...
नांदेड : मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या अहमदाबाद बुलेट ट्रेनला आमचा विरोध कायम आहे. परंतु अधिक वेगाने प्रवास करण्यासाठी जर ही बुलेट ट्रेन महाराष्ट्राच्या इतर भागांतून जात असेल तर ती मराठवाड्यातूनसुद्धा गेली पाहिजे. ही बुलेट ट्रेन मराठवाड्यात आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.
येथील कै. रामगोपाल गुप्ता को-ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीयल इस्टेटच्या इमारत भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे प्रतोद आ. अमरनाथ राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, आ. मोहन हंबर्डे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, महापौर मोहिनीताई येवनकर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, उपमहापौर मसूद खान, मनपा स्थायी समितीचे सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सतीश सामते, उपाध्यक्ष नवल गुप्ता आदींची उपस्थिती होती.
चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राच्या काही भागातून बुलेट ट्रेनचे जाळे विणले जावे यासाठीचे प्रस्ताव पुढे येत आहेत. मुंबईहून सोलापूरमार्गे हैदराबाद व मुंबईहून नागपूर या बुलेट ट्रेनसाठी चाचपणी सुरू असताना बुलेट ट्रेन मुंबईहून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे हैदराबाद व्हावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, केंद्र सरकारमधील संबंधित यंत्रणेलाही भेटणार आहे. परंतु हे काम एकट्या-दुकट्याचे नाही, तर त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. समाजात काम करणाऱ्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था, प्रसार माध्यमे व नागरिकांनी यासाठी जर लोकचळवळ निर्माण केली तर बुलेट ट्रेन हे मराठवाड्यासाठी स्वप्न नव्हे, तर वास्तव होऊ शकते, असा आशावाद त्यांनी या वेळी व्यक्त केला.
मराठवाड्यातील रेल्वेचा विस्तार करण्यासाठी, ब्रॉडगेजसाठी व रेल्वेच्या विभागीय कार्यालयासाठी आपण संघर्ष केला. त्यामुळे यातील अनेक बाबी साध्य झाल्या. त्याच पद्धतीने बुलेट ट्रेनसाठीसुद्धा प्रयत्न करावेत. बुलेट ट्रेनच्या निर्मितीसाठी वेगळ्या भूसंपादनाची गरज नसून समृद्धी महामार्गाने अधिगृहीत केलेल्या जमिनीवरूनच या बुलेट ट्रेनचा मार्ग टाकला जाऊ शकतो, असे मी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले आहे. सुरुवात तर मी केली आहे, आता सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
औद्योगिक वसाहतीतील विविध समस्या सोडविण्यासाठी आपण पूर्वीपासूनच कामाला लागलो असून, या वसाहतीच्या सभोवतालचे रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात येतील, असेही ते म्हणाले.
या वेळी माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, संस्थेचे अध्यक्ष सतीश सामते यांची समयोचित भाषणे झाली. या वेळी काँग्रेसचे कोषाध्यक्ष विजय येवनकर, संपादक शंतनू डोईफोडे, प्रवक्ते संतोष पांडागळे, किशोर स्वामी, नागनाथ गड्डम, मंगेश कदम, किशोर भवरे, अॅड. नीलेश पावडे, राजेश पावडे, रवी कडगे, नितीन आगळे, जयदत्त तक्तापुरे उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले. आभार नारायण क्षीरसागर यांनी मानले.