किनवट तालुक्यात बीएसएनएलची विस्कळीत सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:27 AM2019-06-28T00:27:39+5:302019-06-28T00:27:57+5:30
तालुक्यात बीएसएनएलच्या अनियमित सेवेने ग्राहक जाम वैतागले. चार दिवस सेवा ठप्प एक दिवस कशीबशी सुरू झाली अन ती परत ठप्प यामुळे भारत संचार निगमचे चार ते पाच हजार मोबाईलधारक व अडीचशे टेलिफोन धारक कमालीचे चिडलेले आहेत.
किनवट : तालुक्यात बीएसएनएलच्या अनियमित सेवेने ग्राहक जाम वैतागले. चार दिवस सेवा ठप्प एक दिवस कशीबशी सुरू झाली अन ती परत ठप्प यामुळे भारत संचार निगमचे चार ते पाच हजार मोबाईलधारक व अडीचशे टेलिफोन धारक कमालीचे चिडलेले आहेत.
रिचार्ज २८ दिवसाचा ग्राहक करतात आणि सेवा तेरा चौदा दिवसाची देण्यात येवून लूट केली जात आहे. बीएसएनएलच्या अशा प्रकाराने ग्राहक आपला नंबर पोर्ट करून अन्य कंपनीच्या मोबाईलला जोडून मोकळा होतो.
‘ओएफसी’च्या कामामुळे जागोजागी तुटणे, शेतीच्या कामामुळे केबल तुटणे हे प्रकार नित्याचे झाले. जेंव्हा जेंव्हा ओएफसी मुळे जागोजागी केबल तुटते, तेंव्हा नांदेडहून ओएफसी जोडणारी टीम दाखल होते. तरी देखील सेवा मिळत नाही.
राष्ट्रीय महामार्गाचे काम होईपर्यंत ओएफसी टीमची गाडी मशिनरी साहित्यासह किनवटला ठेवून वारंवार उद्भवणारी समस्या थांबवावी, अशी मागणी ग्राहकांनी केली.
याबाबत जेटीओ रवी कुमार म्हणाले, ओव्हरेड केबलचे काम प्रोसेसमध्ये आहे, पर्यायी व्यवस्था लवकरात लवकर करून ही सेवा सुरळीत देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
फोरजी ऐवजी थ्रीजीची बारडला बीएसएनएलची सेवा
बारड : फोरजीच्या जमान्यात बीएसएनएल कार्यालय अंतर्गत थ्रीजी सेवा मिळत असून थ्रीजीपण चालत नसल्याने या परिसरातील बी.एस.एन.एल. ग्राहक अडचणीत आला. सेवा खंडित झाल्याने फोरजी तर नाहीच थ्रीजी वर चालत होते पण तेही खंडित झाल्याने टूजीचे नेटवर्क देवून ग्राहकांना मिळत असल्याने नेटवर्क प्रॉब्लेम सेवा योग्य मिळत नाही़ नेहमी कार्यालय बंद अवस्थेत असल्याने आणि कर्मचारी मिळत नसल्याने ग्राहक अडचणी मांडणार कुठे हा प्रश्न निर्माण झाला़
बारड येथे केंद्र शासनाने या परिसरातील बी.एस.एन.एल. ग्राहकांचे मोठे जाळे लक्षात घेता बी.एस.एन.एल.कार्यालय या ठिकाणी निर्माण केले. ग्राहकांना सुरळीतपणे सेवा या कार्यालयाअंतर्गत ग्राहकांना देता यावी हाच उद्देश असावा़ परंतु तसे होतांना दिसत नसल्याने कार्यालय नेहमी कुलूप बंद असते़ गेल्या आठ महिन्यापूर्वी याठिकाणी बलवंतकर म्हणून कर्मचारी कार्यरत होते़ त्यांची बदली झाली. तेंव्हापासून नवीन कर्मचाऱ्याची नियुक्ती झाली नाही.