बिल्डर संजय बियाणी हत्येला वर्ष पूर्ण, प्रथमच देशभरातील तपास संस्थांचा नांदेडवर ‘वॉच’

By शिवराज बिचेवार | Published: April 4, 2023 04:28 PM2023-04-04T16:28:06+5:302023-04-04T16:28:34+5:30

एनआयएच्या ताब्यात आहेत बियाणींचे शूटर्स

Builder Sanjay Biyani's murder completes one year, for the first time investigative agencies across the country 'watch' on Nanded | बिल्डर संजय बियाणी हत्येला वर्ष पूर्ण, प्रथमच देशभरातील तपास संस्थांचा नांदेडवर ‘वॉच’

बिल्डर संजय बियाणी हत्येला वर्ष पूर्ण, प्रथमच देशभरातील तपास संस्थांचा नांदेडवर ‘वॉच’

googlenewsNext

नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या या हत्याकांडात एसआयटीने आतापर्यंत १६ जणांना अटक केली आहे. तर बियाणींवर गोळ्या झाडणारे शार्पशूटर एनआयएच्या ताब्यात आहेत. नांदेड पोलिसांनी या शूटर्सकडे चौकशी केली आहे. परंतु अद्यापही त्यांचा ताबा पोलिसांना मिळाला नाही.

५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी हे वाहनातून घराजवळ आले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. त्यानंतर बियाणी यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे यांनी ही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. या तपास पथकात तपासात निष्णात असलेल्या परिक्षेत्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेज, खबऱ्यांकडून मिळालेली माहिती, रेकॉर्डवरील गुन्हेगार याचा सखोल अभ्यास केल्यानंतर या प्रकरणात एक-एक कडी जोडत एसआयटीने १६ जणांना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण ३ पिस्टल आणि ५७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर फरार असलेल्या दोन शार्पशूटरच्या शोधात नांदेडातील पथकांनी हरयाणा, पंजाब, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली यासह अनेक राज्यात हजारो किलोमीटर प्रवास केला. त्यातच एनआयएने दोन्ही शार्पशूटरच्या मुसक्या आवळल्या. हे शार्पशूटर मोहाली येथील बॉम्बस्फोट प्रकरणातही हवे होते. तसेच त्यांच्यावर देशभरात अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या दोन्ही शार्पशूटर एनआयएच्या ताब्यात आहेत. नांदेड पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली आहे. परंतु त्यांच्या हस्तांतरणासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. परंतु बियाणी यांच्या हत्येनंतरही नांदेडातही गोळीबाराच्या घटनांना आवर घालण्यास यश आले नाही.

४० हून अधिक देशी कट्टे जप्त
पोलिसांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यात आरोपींकडून ४० हून अधिक देशी कट्टे जप्त केले आहेत. गुन्हेगारांकडून लुटीच्या उद्देशानेही सर्रासपणे फायरिंग केल्याचीही अनेक प्रकरणे घडली आहेत. तसेच एअरगनचा वापरही वाढला आहे. परंतु हे देशी कट्टे येतात कुठून याचा मात्र अद्याप शोध लागला नाही.

प्रथमच देशभरातील तपास संस्थांचा नांदेडवर ‘वॉच’
बियाणी यांच्या हत्येमागे दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याचा हात असल्याचे पुढे आल्याने देशभरातील तपास यंत्रणांचे लक्ष नांदेडकडे लागले होते. नांदेड पोलिसांशी गेल्या वर्षभरापासून या तपास संस्था बियाणी हत्या आणि इतर हालचालीवरून संपर्कात होत्या.

रिंदा जिवंत की मृत
दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा याचा पाकिस्तानात मृत्यू झाल्याची वार्ता काही महिन्यापूर्वी आली होती. परंतु पोलिस यंत्रणेने त्याला पुष्टी दिली नव्हती. मध्यंतरी रिंदाची एक मुलाखतही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामुळे रिंदा जिवंत की मृत याबाबत अद्यापही संभ्रम आहे. परंतु त्याच्या नावाने खंडणी मागणाऱ्यांच्या मात्र पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

Web Title: Builder Sanjay Biyani's murder completes one year, for the first time investigative agencies across the country 'watch' on Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.