नांदेड जिल्ह्यात बैलजोडीस सोन्याचा भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:19+5:302021-02-17T04:23:19+5:30
शेती म्हटली की बैल आलाच, असे समीकरण असताना आज यंत्रामध्ये शेती व्यवसाय गुरफटला गेला आहे. बैलजोडी सांभाळून शेती करणे ...
शेती म्हटली की बैल आलाच, असे समीकरण असताना आज यंत्रामध्ये शेती व्यवसाय गुरफटला गेला आहे. बैलजोडी सांभाळून शेती करणे आज जिकिरीचे काम झाले आहे. येत्या काळात बैल अथवा दुधाची जनावरे सांभाळणाऱ्यांची संख्या गावपातळीवर बोटावर मोजण्याएवढीच राहील, असे आजचे चित्र आहे. परंतु, काही शेतकरी आजही पारंपरिक शेती करण्यावर भर देत आहेत. परंतु, जमिनीचे तुकडे झाल्याने बैल सांभाळणे परवडणारे नाही. एका बैलाची जोडी जवळपास एक लाख ते साडेतीन लाख रुपयांपर्यंत असल्याचे पाहायला मिळते. नांदेड जिल्ह्यातील नायगाव, मुखेड, जांब, हळी-हंडरगुळी, उमरी, किनवट, बिलोली, अर्धापूर, माहूर, धर्माबाद आदी गावात बैलबाजार भरतो. त्यात कंधार तालुक्यातील बैलबाजार हे कंधारी बैलजोडीसाठी प्रसिद्ध आहेत. सदर बैलांची किंमत दीड ते साडेतीन लाख रुपये किमती आहेत. परंतु, कोरोना संकटामुळे अडचणीत आलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी बैलजोडी विकून दुधाची जनावरे घेणे पसंत केले. दरम्यान, चारा महागल्याने कोणतेही जनावर सांभाळायचे म्हटले तर महिनाकाठी अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो. त्यात दुधाळ जनावरे सांभाळण्यासाठी हिरवा चारा तसेच ढेप, सरकी, खल्ली आदीची गरज असते. बरेच जण शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे दुधाळ जनावरांच्या किमतीत वाढ झाली आहे.