किनवट, मांडवी बंदला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 01:09 AM2019-01-19T01:09:57+5:302019-01-19T01:11:15+5:30
किनवट जिल्हा व मांडवी, इस्लापूर या नवीन तालुक्यांच्या मागणीसाठी १८ जानेवारी रोजी पत्रकार संघाने पुकारलेल्या किनवट बंदला किनवट, मांडवी, सारखणी येथे प्रतिसाद मिळाला.
किनवट : किनवट जिल्हा व मांडवी, इस्लापूर या नवीन तालुक्यांच्या मागणीसाठी १८ जानेवारी रोजी पत्रकार संघाने पुकारलेल्या किनवट बंदला किनवट, मांडवी, सारखणी येथे प्रतिसाद मिळाला.
या बंदमध्ये विविध पक्ष व संघटनांनी भाग घेतला होता व शैक्षणिक संस्था आणि इतरांनी बंदमध्ये सहभागी होऊन किनवट जिल्हा व मांडवी, इस्लापूर हे दोन नवीन तालुके निर्माण करावे, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. यापूवीर्ही किनवट तालुका पत्रकार संघाच्या वतीने १९९७ साली आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. किनवट जिल्हा निर्मितीसाठी यापूर्वी जिल्हा निर्मिती कृती समितीची स्थापणा करण्यात आली होती.
मांडवी येथे ज्येष्ठ पत्रकार सुनील श्रीमनवार यांच्या नेतृत्वाखाली पाळण्यात आलेल्या मांडवी बंदला पाठिंबा दर्शवीत व्यापारी संघटना, डॉक्टर आसोसिएशन, औषधी दुकानदार, सराफा संघटना, आॅटो, जीप, मोटार वाहन संघटना इत्यादी छोट्या-मोठ्या संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या़ शांततेत हा बंद पाळण्यात आला़ सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे स्थानिक पुढारी मंडळी या बंदकडे मात्र फिरकले नाहीत.
सारखणी बंदसाठी सिद्धार्थ मुनेश्वर, त्र्यंबक पूनवटकर, सुभाष कदम, दिनेश चव्हाण, मझहर शेख, सचिन जाधव यांच्यासह व्यापारी लक्ष्मण मिसेवार, कुंदन पवार, बाबूसेठ, पवन जैस्वाल, कॉ. मनोज आडे, राजू बुट्टेकर, गौतम पाटील, सय्यद फाजलाणी यांनी तर उमरी बाजार येथे धनलाल पवार, बंडू नाईक, चंदू चंदलवाड, ज्ञानेश्वर पवार, बावीस्कर, अमोल जाधव यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सिद्धार्थ मुनेश्वर यांनी केले.