पारसनगर भागात घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:17 AM2021-04-11T04:17:42+5:302021-04-11T04:17:42+5:30
राेही पिंपळगाव येथे शेतकऱ्याला मारहाण मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथे किरकोळ कारणावरुन एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना ...
राेही पिंपळगाव येथे शेतकऱ्याला मारहाण
मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथे किरकोळ कारणावरुन एका शेतकऱ्याला मारहाण करण्यात आली. ही घटना ६ एप्रिल रोजी घडली. रामदास यादवराव बलकुलवाड हे शासकीय रुग्णालयाजवळ थांबलेले असताना आरोपी त्या ठिकाणी आला. त्याने बलकुलवाड यांच्यासोबत वाद घालून लाकडाने त्यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणात मुदखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नाल्यातील सांडपाणी काढताना अडविले
हदगाव तालुक्यातील मौजे कोहळी येथे सरपंच इतर कर्मचाऱ्यांसह जेसीबीच्या सहाय्याने नाल्यातील सांडपाणी बाहेर काढत असताना आरोपीने हे काम रोखले. गावात काम करतोस ते मी पाहतो असे म्हणून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणात ग्रामविकास अधिकारी मारोती सोनटक्के यांच्या तक्रारीवरुन हदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
बसस्थानकासमोरच जुगारअड्डा
नायगाव तालुक्यातील गडगा येथे बसस्थानकासमोर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी धाड मारली. ९ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली. यावेळी रोख चार हजार रुपये आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
चार ठिकाणाहून दारु जप्त
जिल्ह्यात लॉकडाऊन असून मद्यविक्रीला बंदी आहे. त्यामुळे अवैध दारु विक्री जोरात सुरु आहे. पोलिसांनी हदगाव, माळाकोळी आणि धर्माबाद या ठिकाणी धाडी मारुन अकरा हजार रुपयांची दारु जप्त केली आहे.
हदगाव तालुक्यातील वाळकी तांडा येथे १,२०० रुपयांची, अन्य एका ठिकाणाहून १ हजार ८००, माळाकोळी हद्दीत मस्की शिवारात अडीच हजारांची देशी तर धर्माबाद येथे पाच हजार रुपयांची विदेशी दारु जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात संबधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.