Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारात धक्कातंत्र? अद्यापही नावं निश्चित नाही; मुख्यमंत्र्यांनी ठेवला सस्पेन्स
By श्रीनिवास भोसले | Published: August 8, 2022 05:36 PM2022-08-08T17:36:53+5:302022-08-08T18:33:19+5:30
आज सकाळपासूनच मुख्यमंत्री यांचा दौरा रद्द होतो की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती.
नांदेड: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा दोन दिवशीय दौरा पूर्वनियोजित होता. परंतु त्यात तब्बल तीन वेळेस बदल करण्यात आला. दरम्यान, आज सकाळपासून मुंबईत मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्यानंतर दौरा रद्द होणार अशी शंका घेण्यात येत होती. मात्र, उशिरा का होईल सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री नांदेडमध्ये दाखल झाले.
आज सकाळपासूनच मुख्यमंत्री यांचा दौरा रद्द होतो की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती. मंगळवारी सकाळी मंत्रीमंडळ विस्तार असल्याने नांदेड मधील त्यांचे समर्थक साशंक होते. परंतु दौऱ्यात बदल करीत शिंदे हे नांदेडमध्ये दाखल झाले.
नांदेडमध्ये आल्यानंतर ते सर्वप्रथम सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी जाणार होते. पण पुन्हां ऐनवेळी ते खासदार हेमंत पाटील यांच्या बँकेला भेट देण्यासाठी गेले. या ठिकाणी रविवारी शिंदे गटात सहभागी झालेले दोन्ही जिल्हाप्रमुख आणि तालुका प्रमुख यांनी त्यांची भेट घेतली. मंत्रिमंडळातील नावांबाबत विचारले असता मुख्यमंत्री शिंदे यांनी अद्याप नावे नक्की झाली नाहीत. आज रात्रीपर्यंत मंत्रीमंडळात कोण असतील याची यादी नक्की होईल अशी माहिती दिली.