माहूर स्कायवॉकचे काम वर्षभरात पूर्ण करून लोकार्पणासाठी बोलवा; गडकरींची कडक सूचना 

By श्रीनिवास भोसले | Published: May 20, 2023 04:19 PM2023-05-20T16:19:50+5:302023-05-20T16:20:22+5:30

माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदिरात वृद्ध व दिव्यांग भक्तांना  ये-जा करण्यासाठी मंजूर ५१ कोटी रुपयांच्या लिफ्टसह स्कायवॉकचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले

Call for completion of Mahur Skywalk within a year; Central Minister Nitin Gadkari's strict instructions to the contractor | माहूर स्कायवॉकचे काम वर्षभरात पूर्ण करून लोकार्पणासाठी बोलवा; गडकरींची कडक सूचना 

माहूर स्कायवॉकचे काम वर्षभरात पूर्ण करून लोकार्पणासाठी बोलवा; गडकरींची कडक सूचना 

googlenewsNext

माहूर: एवढ्या छोट्या कामाला १८ महिने कसे लागतात हेच मला कळले नाही. मी दिल्ली- मुंबई या हायवेचे १ लाख कोटींची काम दोन वर्षात पूर्ण केले होते. तेव्हा ५१ कोटींच्या या स्कायवॉकचे काम करण्यास १८ महिने कशाला दिले हे मला समजले नाही. हे काम वर्षभरात पूर्ण करा मी एक वर्षाने मातेच्या दर्शनासाठी पुन्हा येईन तेव्हा स्कायवॉकने गडावर जाईल, अशा कडक शब्दात सूचना वजा तंबी केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कंत्राटदारास दिली. 

केंद्रीय मंत्री गडकरी माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदिरात वृद्ध व दिव्यांग भक्तांना  ये-जा करण्यासाठी मंजूर ५१ कोटी रुपयांच्या लिफ्टसह स्काय वॉकचे भूमीपूजन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष रेणुकादेवी संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेडचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश नाव्हकर हे होते. प्रमुख अतिथी खा. हेमंत पाटील, आ.भीमराव केराम, आ.मदन येरावार, आ.तुषार राठोड, आ.श्यामसुंदर शिंदे, आ.नामदेव ससाणे,  आ.राम पाटील रातोळीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, श्याम भारती महाराज, माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी  यांची उपस्थिती होती. 

पुढे बोलतांना गडकरी म्हणाले की, सदर कामाच्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झालेल्या असून कोणतीही अडचण राहिलेली नाही. त्यामध्ये वनविभागाची महत्वाची असलेली संमती सुद्धा झालेली आहे. एक वर्षात काम पूर्ण केले तर देशभरात २६० रोपवे केबल कारच्या १ लाख २५ हजार कोटींची प्रस्तावित कामांपैकी १०० कामे तुम्हाला देईल, असे आवाहन कंत्राटदारास गडकरी यांनी केले. पूर्वी मला नागपूर ते माहूर यायचे झाले तर   ८ तास वेळ लागत होता.  राष्ट्रीय महामार्गाचे काम झाल्यानंतर प्रथमच मी आज या  रस्त्याने प्रवास करून नागपूर ते माहूर प्रवास केवळ अडीच तासात पूर्ण करून माहूरगड येथे पोहचलो. याचा आज मला अतिशय आनंद झाला. माझ्या हातून आणखीही विकास कामे व्हावे यासाठी आई रेणुकामातेकडे निरोगी आयुष्य देण्याचे साकडे घातले असल्याचे सांगितले. 

यावेळी नांदेड जिल्ह्यातील विविध रस्ते व पुलाकरिता १७६५ कोटी रुपये निधीची घोषणा गडकरी यांनी केली. प्रस्तावित कामे रावी ते देगलूर ३१ कि.मी ३०० कोटी, आदमपूरफाटा ते सगरोळी २२ कि.मी. २३० कोटी    फुलसांवगी ते माहूर  ३० कि.मी.  ३५०  कोटी, लोहा ते गंगाखेड रस्ता सुधारणा  ४२कि.मी ४२५, कोटी, भोकर शहर बायपास फ्लाय ओव्हर १०० कोटी, कुंद्राळा ते वझर १६१  च्या ५ कि.मी. ७ कोटी, उदगीर ते रावी २६.५ किमी साठी ३०० कोटी, कलाडगाव ता. अर्धापूर येथे मोठ्या पुलाचे रुंदिकरण ३५ कोटी,असे १७६५ कोटी व  CIRF अंतर्गत उमरी तळेगाव, उमरी वाघोळा धानोरा, करखेली रेल्वेस्टेशन,सायखेड जरीकोट दिग्रस रस्त्याची सुधारणा करणे, किनवट नागझारी नांदीगुडा ते तेलंगना राज्य सीमा, पेठवडज ते भिलूर, असे एकूण ४६ किमीच्या कामांना मंजुरी दिली.

कार्यक्रमास सहायक जिल्हाधिकारी नेहा भोसले यांची उपस्थिती होती. तर जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांचे मार्गदर्शनात पो.नि. नितीन काशिकर व त्यांचे सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सा.बां. मंत्री रविंद्र चव्हाण, नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, लातूरचे खा. सुधाकर शृंगारे व  निमंत्रण पत्रिकेत समावेश असलेल्या अनेक आमदारांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून आले.

Web Title: Call for completion of Mahur Skywalk within a year; Central Minister Nitin Gadkari's strict instructions to the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.