वाळूघाटावरील छावण्या उरल्या नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 12:18 AM2019-05-28T00:18:17+5:302019-05-28T00:19:17+5:30
जिल्ह्यात महसूल प्रशासनाने १२ वाळू घाटांना मंजुरी दिली आहे़ या घाटावरुन बेसुमार वाळू उपसा होवू नये यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली होती़ तसेच प्रत्येक घाटावर एक छावणी उभारण्यात आली होती़ परंतु रात्रीच्या वेळी या छावणीसमोरुनच मोठ्या प्रमाणात वाळूचे ट्रक बिनदिक्कतपणे जात आहेत़
नांदेड : जिल्ह्यात महसूल प्रशासनाने १२ वाळू घाटांना मंजुरी दिली आहे़ या घाटावरुन बेसुमार वाळू उपसा होवू नये यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली होती़ तसेच प्रत्येक घाटावर एक छावणी उभारण्यात आली होती़ परंतु रात्रीच्या वेळी या छावणीसमोरुनच मोठ्या प्रमाणात वाळूचे ट्रक बिनदिक्कतपणे जात आहेत़ नांदेड शहरानजीक भनगी, कौठा, असर्जन या भागात रात्रभर वाळू उपसा करण्यात येत आहे़
जिल्ह्यात नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून त्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होत आहे़ परवानगी नसतानाही अनेक घाटांवरुन अनधिकृतपणे वाळूचा उपसा करण्यात येत आहे़ त्यासाठी महसूलमधील काही जणांचे वाळू माफीयांशी लागेबांधे असण्याची दाट शक्यता आहे़ मध्यंतरी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी वाळूमाफियांवर कारवाई केली होती़ त्यानंतर वाळू उपसा रोखण्यासाठी विशेष पथकांची स्थापना केली होती़ परंतु ही विशेष पथके नावालाच असल्याचे आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामगिरीवरुन दिसून येते़ त्यात वाळू घाटावर उभारण्यात आलेल्या छावण्यांचा वाळू उपशावर किती परिणाम झाला हाही संशोधनाचा विषय आहे़ छावण्या असतानाही रात्रभर वाळू उपसा करण्यात येत आहे़ नांदेड तालुक्यात रात्रीच्या वेळी तराफ्यावरुन वाळू काढण्यात येत आहे़ जवळपास एक ब्रास वाळूसाठी सध्या ३५०० ते ३७०० रुपये मोजावे लागत आहेत़ एका रात्रीत या भागातून जवळपास १०० ब्रास वाळू उपसा करण्यात येत आहे़ रात्री कौठा भागात वाळू घेवून जाणाऱ्या वाहनांची रांग दिसून येते़
चौकात खबरे तैनात
वाळू माफियांवर कारवाईसाठी प्रशासनाने पथके तयार केली़परंतु या पथकांना वाळू माफिया सहज चुकारा देत आहेत़ मुख्य चौकात वाळू माफिया आपले खबरे रात्रभर बसवितात़ महसूल किंवा पोलिसांची गाडी घाटाकडे जाणा-या रस्त्यावर चालल्याचा अंदाज येताच फोनवरुन घाटावरील सर्व वाहनधारकांना सतर्क केले जाते़ काही वेळातच ही वाहने दुस-या मार्गाला नेण्यात येतात़