उमरी तालुक्यात उमेदवारांचा ग्रामीण मतदारांशी संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 12:22 AM2019-04-14T00:22:58+5:302019-04-14T00:23:56+5:30
नांदेड लोकसभा निवडणूक प्रचाराची खरी रणधुमाळी सध्या उमरी तालुक्याच्या गावांमधून पाहावयास मिळत आहे़ महाआघाडीचे अशोक चव्हाण, युतीचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभा या भागात झाल्या असून वंचित आघाडीच्या सभा दोन दिवसांत होणार आहेत़
बी़ व्ही़ चव्हाण ।
उमरी : नांदेडलोकसभा निवडणूक प्रचाराची खरी रणधुमाळी सध्या उमरी तालुक्याच्या गावांमधून पाहावयास मिळत आहे़ महाआघाडीचे अशोक चव्हाण, युतीचे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभा या भागात झाल्या असून वंचित आघाडीच्या सभा दोन दिवसांत होणार आहेत़ त्यामुळे निवडणुकीचे वातावरण तापले आहे़
माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर, आ़ अमिता चव्हाण, आ़ वसंत चव्हाण, डॉ़ माधवराव किन्हाळकर, राजेश पवार, बबनराव लोणीकर, श्रावण पाटील भिलवंडे आदी नेते ग्रामीण भागात मतदारांशी संवाद साधत आहेत़ एकंदरित या तालुक्यात ग्रामीण मतांवर प्रमख उमेदवारांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे़
उमरी तालुक्यात गोरठेकरांच्या वाड्यावरून अशोक चव्हाण यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला़ कमलकिशोर कदम, गंगाधरराव कुंटूरकर, शंकरअण्णा धोंडगे, आ़ अमर राजूरकर आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही पहिली प्रचारसभा झाली़ आघाडी झाल्यावर प्रत्येक निवडणुकांमध्ये काँग्रेसने नांदेड जिल्ह्यात आघाडीधर्म पाळला आहे़ मागील सर्व कटूता बाजूला ठेवून आपण सर्वांनी एकत्र आलो तरच आपल्या पक्षांचे अस्तित्व टिकून राहील व जिल्ह्याचा विकास करता येईल़ ही बाब अशोक चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केली़ चव्हाण यांच्या या प्रचारसभेच्या दुसऱ्या दिवशी महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचीही उमरीत प्रचार सभा घेतली़ गोरठेकरांच्या वाड्यावर अशोकरावांपेक्षा माझा अधिक अधिकार असल्याचा दावा चिखलीकर यांनी या सभेत केला़ तत्पूर्वी चिखलीकरांनी गोरठ्याच्या वाड्यावर भेट देवून पाहुणचार घेतला़ यावेळी गोरठेकरांचे चिरंजीव पं़ स़ सभापती शिरीषराव देशमुख तसेच कैलासराव देशमुख व राष्ट्रवादीचे इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते़ माजी खा़ भास्करराव पाटील खतगावकर, राजेश पवार, मिनल खतगावकर, बालाजी बच्चेवार, शिवराज होटाळकर यांनी मतदारांशी संवाद साधला़
युती । प्लस पॉर्इंट काय आहेत?
मराठा लॉबी उमरी तालुक्यात सर्वाधिक आहे़ युतीचे उमेदवार हे गोरठेकरांचे जुने मित्र आहेत़ मागील पाच वर्षांत भाजपाचे राजेश पवार यांनी उमरी तालुक्यात चांगला संपर्क ठेवला आहे़
युती । वीक पॉर्इंट काय आहेत?
उमरी तालुक्यात शिवसेना, भाजप यांचे जि़प़, पं़ स़ , नगर परिषद एकही सदस्य नाही़ निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारही मिळत नाही़ पूर्ण जागाही त्यांनी मागील १५ वर्षात लढविल्या नाहीत़
आघाडी । प्लस पॉर्इंट काय आहेत?
तालुक्यातील मतदार हा पूर्वीपासून काँग्रेसच्या पाठीशी राहिला आह़े त्यानंतर राष्ट्रवादी आल्यानंतर या भागात सिंचनाचे काम झाले़ काँग्रेसच्या प्रचाराचा प्रारंभ गोरठेकर यांच्या वाड्यावरून झाला़
आघाडी । वीक पॉर्इंट काय आहेत?
या भागात अशोक चव्हाण व गोरठेकर यांचे राजकीय वैमनस्य सर्वश्रुत आहे़ त्याचा परिणाम विकासकामावरही झाला आहे़ नवीन प्रकल्प या ठिकाणी झाला नाही़ तसेच रस्त्याचे कामेही झाले नाहीत़
वंचित आघाडीच्या प्रचारसभा
महाआघाडी, युतीने गोरठेकरांच्या वाड्यावरील जवळीक अधिक घट्ट केली आहे़ दुर्गानगर तांडा येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आ़ अमिता चव्हाण यांनी गोरठेकरांच्या वाड्यावर भेट दिली़ स्वत: गोरठेकर यांनी त्यांचे स्वागत केले़ वंचित आघाडीचे उमेदवार प्रा़ यशपाल भिंगे यांनी १३ एप्रिल रोजी उमरी येथील मोंढा मैदानावर प्रचार सभा घेतली़ तत्पूर्वी गोळेगाव व बितनाळ येथेही त्यांच्या प्रचारसभा झाल्या़