नामांकन अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी उमेदवारांची मध्यरात्रीपर्यंत जागरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:14 AM2020-12-26T04:14:25+5:302020-12-26T04:14:25+5:30
उमेदवारी अर्ज हे ऑनलाइन भरून याची मूळ प्रत तहसील कार्यालयात जमा करावी लागणार असून उमेदवारी अर्ज ऑनलाइन करण्यासाठी अनेक ...
उमेदवारी अर्ज हे ऑनलाइन भरून याची मूळ प्रत तहसील कार्यालयात जमा करावी लागणार असून उमेदवारी अर्ज ऑनलाइन करण्यासाठी अनेक उमेदवारांना रात्र जागून काढावी लागत आहे. राजकारणातील प्रवेशाची पहिली पायरी ही ग्रामपंचायत निवडणुकीला समजले जाते. १४ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींचे महत्त्व फार वाढले आहे. शिवाय ग्रामीण भागात पकड मजबूत करून याच आधारावर पुढील निवडणुकीचे गणित केले जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला फार महत्त्व आहे. तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर काही राजकीय पक्षांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळविला आहे. त्यामुळे गत आठवड्यापासून ग्रामीण भागात सभा, बैठकी, गृहभेटीचे सत्र सुरू झाले आहे, तर २३ डिसेंबरपासून निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे गुलाबी थंडीत निवडणुकीचा ज्वर वाढणार आहे.
या निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक विभागाच्या संकेत स्थळावर २३ ते ३० डिसेंबरपर्यंत ऑनलाइन उमेदवारी अर्ज भरायचा असल्याने शहरातील सुविधा केंद्र, मल्टिसर्व्हिसेस हाऊसफुल आहेत. तर अनेक निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ऑनलाइन करण्यासाठी मध्यरात्रीपर्यंत जागरण करावे लागत आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक कोणत्याही पक्षाच्या नावावर लढविली जात नसली तरी पॕॅनल तयार करून त्या राजकीय पक्ष लढवीत असतात. त्यामुळे सध्या निवडणूक होऊ घातलेल्या गावांत सर्वच पक्षांच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत.