तोडणीसाठी शेतात जाता येईना; सततच्या पावसामुळे मूग, उडीद हातचे गेले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 07:52 PM2020-08-21T19:52:39+5:302020-08-21T19:54:12+5:30
मागील सात, आठ दिवसापासून जिल्ह्यात कुठे रिपरिप तर कुठे दमदार पाऊस होत आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग व उदीडाचे पीक वाया गेले आहे़
नांदेड : मागील सात, आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने काढणीला आलेल्या मुगाचे ५० टक्के नुकसान केले असून सोयाबीनचे पीकही पिवळे पडले आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला आहे़
सध्या मूग काढणीला आला आहे़ मात्र याच वेळेला पावसाने हजेरी लावली़ त्यामुळे मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जात येत नाही़ मागील सात, आठ दिवसापासून जिल्ह्यात कुठे रिपरिप तर कुठे दमदार पाऊस होत आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले मूग व उदीडाचे पीक वाया गेले आहे़ तर सोयाबीनचे पीकही पिवळे पडत चालले आहे़
जिल्ह्यात हिमायतनगर, किनवट, भोकर, माहूर या तालुक्यातील नद्या, नाल्यांना पूर आला असून काही गावांचा संपर्क तुटला आहे़ या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोेठ्या प्रमाणात नुकसान केले आहे़ सुरूवातीला झालेल्या पोषक पावसामुळे यंदा मुग, सोयाबीनचे पिके जोमात आली होती़ मुगाच्या शेंगा काढणीला आल्या होत्या़ मात्र ऐन वेळेला पावसाने हजेरी लावल्याने मुगाच्या शेंगा काढण्यास वेळच मिळाला नाही़ यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली होती़ मात्र आता मूग, उडीद व सोयाबीन हे पिके हातची गेले आहेत़ सर्वाधिक नुकसान मुगाच्या पिकाचे झाले असून काढणीला आलेल्या शेंगा वाळल्या असून त्यातून आता मोड बाहेर येत आहेत़ त्यामुळे मुगाचे पीक पुर्णत: हातचे गेले आहे़ उडीदाच्याशेंगा परिपक्व नसल्याने त्या काढणीला आल्या नाहीत़ दरम्यान, बुधवारी दिवसभर उघडीप दिल्यानंतर गुरूवारी पुन्हा सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली़ हवामान विभागाने पुढील पाच दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे़ त्यामुळे आता उरलेल्या मूगाचे पीकही हातचे जाणार आहे़ नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़
मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जाता येईना
जिल्ह्यात यंदा जवळपास ५० हजार हेक्टरवर मूग आणि उडीदाचा पेरा झाला आहे़ सुरूवातीला या पिकांना पोषक पाऊस झाल्याने मूग, उडीदाचे पिक बहरले होते़ सध्या मूग काढणीला आला असून सततच्या पावसाने मूग तोडणीसाठी मजुरांना शेतात जात येत नाही़ त्यामुळे मूग तोडणी लांबली आहे़ मुगास यंदा प्रति हेक्टरी पाच ते सात क्विंटलचा उतारा येत आहे़ उडीदाच्या शेंगा परिपक्व झाल्या असल्या तरी काढणीस आल्या नाहीत़ त्यामुळे उडीदाचे फारसे नुकसान झाले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत़ मात्र मुगाच्या शेंगा वाळल्या असून सततच्या पावसाने शेंगातून मोड बाहेर येत आहेत़ त्यामुळे मूगाचे पिक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे चित्र असून, पाऊस असाच राहिल्यास सोयाबीनलाही धोका होण्याची भिती व्यक्त केली जात आहे़
२६ हजार हेक्टरवर पेरणी
मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेवून शेतकऱ्यांनी यंदा कापसाऐवजी सोयाबीनचा पेरा मोठ्या प्रमाणावर केला आहे़ तर मूगाची २६ हजार हेक्टरवर पेरणी केली होती़ ऐन मूग काढणीला सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केल्याचे पिंपरी महिपाल येथील शेतकरी नागोराव चंदेल यांनी सांगितले़