सलग २२ तास चालविली कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 01:07 AM2019-05-08T01:07:59+5:302019-05-08T01:08:23+5:30
एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी पुरुषोत्तम शिंदे याने सलग २२ तास ५७ मिनिटे नॉनस्टॉप कार चालवून १ हजार ६९३ किलोमीटर अंतर पार करण्याचा आगळावेगळा विक्रम केला
नांदेड : एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षाचा विद्यार्थी पुरुषोत्तम शिंदे याने सलग २२ तास ५७ मिनिटे नॉनस्टॉप कार चालवून १ हजार ६९३ किलोमीटर अंतर पार करण्याचा आगळावेगळा विक्रम केला आहे़ शिंदे याच्या विक्रमाची नोंद इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली आहे़ या कामगिरीबद्दल शिंदे याचा महाविद्यालयाच्या संचालिका डॉग़ीता लाठकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला़
पुरूषोत्तम शिंदे शिक्षण घेत आहे़ १७ मार्च २०१९ रोजी सकाळी ११़४१ वाजता शमशादाबाद-हैद्राबाद येथून त्याने कार प्रवास सुरू केला़ तो १८ मार्च २०१९ रोजी सकाळी १०़३८ वाजता रामराजूपल्ला आंध्रप्रदेश येथे पोहोचला़ या सर्व प्रवासाचे व्हिडिओ रेकॉर्डींग इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्ला पाठविण्यात आले. या गोष्टींची दखल घेत इंडिया बुक आॅफ रेकॉर्डचे मुख्य डॉ.विश्वरूप राय चौधरी यांनी पुरूषोत्तम यास गोल्डमेडल आणि प्रशस्तिपत्र देवून सन्मानित केले़
एमजीएम महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.गीता लाठकर यांनी पुरूषोत्तमला हा विक्रम करण्यासाठी आंध्रप्रदेश पोलिसांची व शासनाची परवानगी घेण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तसेच प्रवासाच्या खर्चासाठी आर्थिक मदत देवून प्रोत्साहित केले.
प्रवासादरम्यान पुरूषोत्तमचा मित्र विनायक शिवनकर हा मदतीसाठी सोबत होता.
या यशाबद्दल महाविद्यालयातर्फे डॉ.गीता लाठकर यांनी कौतुक केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.शिरीष कोटगिरे, सांस्कृतिक समन्वयक डॉ.गोविंद हंबर्डे, प्रा. पंकज पवार आदी उपस्थित होते. यापुढे लिमका बुक आॅफ रेकॉर्डसाठी प्रवेशिका सादर करणार असल्याचे पुरुषोत्तम शिंदे याने सांगितले़