मनोज जरांगेंची रात्री उशिरा विनापरवानगी सभा; नांदेडात गुन्हा दाखल
By शिवराज बिचेवार | Published: March 5, 2024 05:30 PM2024-03-05T17:30:46+5:302024-03-05T17:31:30+5:30
या प्रकरणात मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
नांदेड- मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे सोमवारी नांदेडात आले होते. त्यांची रात्री पावणेबारा वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यालयात जाहिर सभा घेण्यात आली. या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यात आल्याने या प्रकरणात मनोज जरांगे पाटील आणि आयोजक श्याम वडजे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मनोज जरांगे पाटील हे सोमवारी रात्री नांदेडात आले होते. महादेव पिंपळगाव येथे एका लग्न समारंभाला उपस्थितीनंतर रात्री साडे अकरा वाजता ते चांदोजी पावडे मंगल कार्यालयात आले. या ठिकाणी हजारो मराठा समाज बांधव उपस्थित होते. त्यांच्या आगमनावेळी मंगल कार्यालयाबाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांशी संवाद साधला. ही सभा रात्री साडे बारा वाजता संपली.
यावेळी भाग्यनगरच्या पोलिसांनी तिथे धाव घेवून सभेच्या परवानगीबाबत चौकशी केली असता, परवानगी नसल्याचे पुढे आले. त्यामुळे विनापरवानगी सभा घेणे, जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन तसेच रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपकाचा वापर केल्याच्या कलमाखाली मनोज जरांगे पाटील आणि श्याम वडजे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.