कुणबी नोंदी शोधण्यात अधिकाऱ्यांकडून जातीवाद; मनोज जरांगे-पाटील यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 06:02 AM2023-12-10T06:02:22+5:302023-12-10T06:03:09+5:30
मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूर जिल्ह्यांत नोंदी कमी आढळून येत आहेत.
नांदेड : मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि लातूर जिल्ह्यांत नोंदी कमी आढळून येत आहेत. नाेंदी आहेत; परंतु अभ्यासक नाहीत. अभ्यासक नसल्यामुळे नोंदी असूनही काही अधिकारी जातीवाद करीत आहेत, असा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला. ही बाब आपण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचेही त्यांनी सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील जांब (ता. मुखेड) येथे शनिवारी जाहीर सभा झाली. जरांगे पाटील म्हणाले की, इथले अधिकारी नोंदी बघत नाहीत किंवा त्यासाठी वेळ देत नाहीत. मोडी लिपी अभ्यासक नसल्याने अधिकारी केवळ कागदांचे गठ्ठे काढणे आणि बांधून ठेवणे, हेच काम करत आहेत. आमच्या लेकराचं भविष्य महत्त्वाचं आहे. ज्यांना मोठे केले, तेच विरोधात गेल्यास पायाखाली तुडविण्यासही मागेपुढे पाहणार नाही. २४ डिसेंबरनंतर यांना गावात फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
शहाणपणाने वागावे
लोकशाहीत सभा घेण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी जातीवाचक बोलू नये.
आपल्या वयाचा विचार करून किमान शहाणपणाची भूमिका घ्यावी. मराठा आरक्षणाच्या विरोधात वक्तव्ये करू नये, असे आम्हाला वाटते, असेही जरांगे-पाटील म्हणाले.
इंचही हटणार नाही : आरक्षणाचा विषय अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ३५ लाख मराठा बांधवांना आरक्षण मिळाले आहे. आरक्षणासाठी आपण शांततेने लढा सुरू ठेवणार असून, एक इंचही मागे हटणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.