१ जून रोजी खरेदी केंद्र बंद होणार; यंदा खरेदीविना कापूस पडून राहण्याची भिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 04:49 PM2020-05-18T16:49:28+5:302020-05-18T16:53:07+5:30
यावर्षी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र हे केंद्र विविध कारणामुळे तीन वेळा बंद पडले. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळत गेली.
- गोकुळ भवरे
किनवट (जि. नांदेड) : किनवट तालुक्यातील चिखलीफाटा येथील कापूस खरेदी केंद्र १ जून रोजी बंद होणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील तीन दिवसात या केंद्रावर ९५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला. अद्याप २ हजार ४०१ शेतकऱ्यांचा नोंदणी केलेला कापूस खरेदी करणे बाकी आहे. त्यामुळे उरलेल्या दहा ते बारा दिवसात या कापसाची खरेदी प्रक्रिया कशी पार पडणार असा प्रश्न उपस्थित होत असून, यंदा मोठ्या प्रमाणात कापूस तोलाईविना पडून राहण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
किनवट तालुक्यातील कापूस हे नगदी व मुख्य पीक असल्याने शेतकरी कापूस वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. यावर्षी खरीप हंगाम २०१९-२० मध्ये खरेदी केंद्र सुरू करण्यात आले मात्र हे केंद्र विविध कारणामुळे तीन वेळा बंद पडले. त्यामुळे खरेदी प्रक्रिया रेंगाळत गेली. सध्या तिसऱ्यांदा कापूस खरेदी केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रावर मागील तीन दिवसात नोंदणी झालेल्या २ हजार ४९६ शेतकऱ्यांपैकी ९५ शेतकऱ्यांचा २ हजार ४५ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. सीसीआयने तिसऱ्यांदा कापूस खरेदी सुरू केली मात्र अधूनमधून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने खरेदी प्रक्रिया खोळंबत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रवि तिरमनवार यांनी सांगितले.
तीन दिवसांत ९५ शेतकऱ्यांचा कापूस खरेदी झालेला असल्याने उर्वरीत बारा दिवसात साधारणपणे पाचशे शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी होऊ शकते. असे झाल्यास उर्वरीत साधारण १ हजार ९०० शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून राहण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कॉटन कॉर्पोरेशन आॅफ इंडियातर्फे सुरु असलेली किनवट येथील कापूस खरेदी बंद झाल्यास तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला कापूस एकतर तेलंगणातील आदीलाबाद येथे नेऊन विकावा लागेल. सध्या लॉकडाऊनमुळे बाहेर कापूस पाठविणे अवघड आहे. त्यातच तेथे काय भाव मिळेल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे स्थानिक खासगी व्यापाऱ्यांना मिळेल त्या भावाने माल देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आढावू शकते. या सर्व प्रकारामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
प्रति क्विंटल दोन हजार रुपये मदतीची मागणी
पावसाळ्यात कापूस खरेदी होणार नसल्याने उर्वरीत हजारो क्विंटल कापूस यंदा खरेदीविना पडून राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोंदणी झालेल्या पण कापूस खरेदी न झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने प्रति क्विंटल दोन हजार रुपये मदत देण्याची मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे.
लॉकडाऊनमुळे मिळेनात कुशल मजूर
एम. एच. कॉटेज जिनिंग प्रेसिंगमध्ये सध्या कापूस खरेदी सुरु आहे. मात्र लॉकडाऊनमुळे या ठिकाणी कुशल मजूर उपलब्ध झालेला नाही. पर्यायाने स्थानिक मजुरांकडून काम केले जात आहे. त्यामुळेही खरेदी प्रकिया संथपणे सुरु आहे. तांत्रिक मजूर उपलब्ध नसल्याने चार दिवसांत चार मोटर जळाल्या असल्याचे जिनिंग प्रेसिंगचे व्यवस्थापक कल्हाळे यांनी सांगितले.