सीईओ निघाले विमानाने कुंभमेळ्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:48 AM2019-03-03T00:48:03+5:302019-03-03T00:48:41+5:30
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माहूरचे गटविकास अधिकारी तोटावड यांच्यासह राज्यातील तीर्थक्षेत्र ठिकाणचे २० वरिष्ठ अधिकारी तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी कुंभमेळ्याला जात आहेत.
नांदेड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, माहूरचे गटविकास अधिकारी तोटावड यांच्यासह राज्यातील तीर्थक्षेत्र ठिकाणचे २० वरिष्ठ अधिकारी तीन दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी कुंभमेळ्याला जात आहेत. या दौऱ्यात ते उत्तर प्रदेश येथील कुंभमेळ्यासाठी उपस्थित राहणा-या भाविकांकरिता पुरविण्यात येत असलेल्या स्वच्छताविषयक सुविधांचा तसेच संनियंत्रणाचा अभ्यास करणार आहेत. या दौ-यासाठी विशेष बाब म्हणून, विमानाने जाण्याची परवानगी शासनाने दिली आहे.
कुंभमेळ्यात उत्तर प्रदेश शासनाने भाविकांसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठीचे मनुष्यबळ इतर विभागांशी केलेला समन्वय, आर्थिक तरतूद, प्रचारप्रसिद्धी, क्षमता बांधणीसह स्वच्छताविषयक सुविधांचा अभ्यास करण्यासाठी ३ ते ५ मार्च असा तीन दिवसांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौ-यासाठी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, कोल्हापूर, नंदुरबार, अकोला आदी ठिकाणच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. याबरोबरच २० जणांच्या या पथकात माहूरसह पंढरपूर, शेगाव, त्र्यंबकेश्वर, राहता आदी ठिकाणच्या गटविकास अधिका-यांनाही अभ्यासाची संधी मिळाली आहे. सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, नगर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी या दौ-यात सहभागी होत असून धारणी येथील उपविभागीय अधिकारी तसेच पालघर जिल्ह्यातील सहायक जिल्हाधिकारीही या दौ-याला जात आहेत.
या अधिका-यांनी कुंभमेळ्यात भाविकांना दिल्या जाणा-या सुविधांचा तसेच तेथील नियोजनांचा अभ्यास करुन त्याच पद्धतीने त्यांच्या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र ठिकाणी सुधारणा करणे अपेक्षित आहे.