बारावीच्या परीक्षार्थींना खुर्ची दिली पण डेस्क गायब, पहिल्याच पेपरला नियोजनाचा फज्जा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 06:37 PM2024-02-21T18:37:24+5:302024-02-21T18:38:11+5:30
देगलूरच्या धुंडा महाराज महाविद्यालयातील प्रकार.
- शब्बीर शेख
देगलूर: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या बारावीच्या परीक्षांना बुधवारपासून सुरुवात झाली. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता शिक्षण मंडळाने योग्य ती तयारी करून घेणे अपेक्षित होते.मात्र शिक्षण मंडळाच्या ढिसाळ नियोजनामुळे परीक्षार्थींना डेस्कच उपलब्ध नसल्याने चक्क खुर्चीवर बसूनच परीक्षा द्यावी लागल्याचा प्रकार शहरातील धुंडा महाराज महाविद्यालयात घडला आहे. याप्रकरणी विद्यार्थ्यांसह पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील आश्रम शाळा शिळवणी तांडा, इंदिराबाई देशमुख महाविद्यालय हणेगाव,श्री छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज मरखेल तसेच शहरातील देगलूर महाविद्यालय , धुंडा महाराज महाविद्यालय, व मानव्य विकास विद्यालय अशा सहा ठिकाणी एकूण 2451 विद्यार्थी बारावीच्या परीक्षा देत आहेत. त्यापैकी शहरात असलेल्या धुंडा महाराज महाविद्यालय येथे 324 विद्यार्थी परीक्षा देत असताना मात्र या महाविद्यालयात 220 डेस्कच उपलब्ध असल्याने उर्वरित परीक्षार्थींना डिस्कविनाच फक्त खुर्चीवर बसूनच पेपर लिहिण्याची नामुष्की ओढवली आहे.
विशेष म्हणजे परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची मोठी संख्या लक्षात घेता तालुक्यातील शिक्षण मंडळाने योग्य ती तयारी करून घेणे अपेक्षित होते. याकडे डोळे झाक केल्याने परीक्षार्थी यांच्यावर आजचा प्रसंग ओढवला आहे. यामुळे तालुक्यातील शिक्षण विभागाचा नियोजन शून्य कारभार पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आला आहे. याप्रकरणी अधिकची माहिती घेण्यासाठी परीक्षा प्रमुख तथा गटशिक्षणाधिकारी तोटरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
अभिप्राय नोंदवला आहे
आज सकाळी परीक्षेदरम्यान धुंडा महाराज महाविद्यालयास भेट दिली असता हा प्रकार माझ्याही निदर्शनास आला आहे. याप्रकरणी मी माझा अभिप्राय नोंदविला असून सोबतच हा संपूर्ण प्रकार नांदेडचे शिक्षणाधिकारी यांच्याही कानावर घातले आहे.
- राजाभाऊ कदम, तहसीलदार,देगलूर
योग्य ती काळजी घ्यावी
खुर्चीवर पेपर लिहिताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याप्रकरणी शिक्षण विभागाने वेळीच लक्ष देऊन विद्यार्थ्यांना होणारा त्रास थांबवावा.
- धनाजी जोशी, शिवसेना, शहर संघटक (शिंदे गट)