नांदेड जिल्हा परिषदेत बदल्यांची धामधूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 01:13 AM2018-04-29T01:13:33+5:302018-04-29T01:13:33+5:30
प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया मागील काही वर्षांपासून ई-पोर्टल पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा जिल्हा प्रशासनाने कर्मचा-यांच्या बदलीप्रक्रियेतही हाच समुपदेशनाचा मार्ग अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून या प्रक्रियेला ५ मे पासून प्रारंभ होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया मागील काही वर्षांपासून ई-पोर्टल पद्धतीने करण्यात येत आहे. यंदा जिल्हा प्रशासनाने कर्मचा-यांच्या बदलीप्रक्रियेतही हाच समुपदेशनाचा मार्ग अवलंबिण्याचा निर्णय घेतला असून या प्रक्रियेला ५ मे पासून प्रारंभ होणार आहे.
प्राथमिक शिक्षक वगळता जिल्हा परिषदेच्या गट ‘क’ व गट ‘ड’ कर्मचाºयांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला जिल्हा परिषदेत सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार समुपदेशनाच्या माध्यमातून सार्वत्रिक बदल्या करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी समुपदेशनाचे वेळापत्रकही तयार केल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सांगितले.
जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षक वगळता शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महिला बालकल्याण, अभियांत्रिकी, ग्रामीण पाणीपुरवठा, सामान्य प्रशासनासह विविध विभागाच्या गट ‘क’ व गट ‘ड’ कर्मचाºयांच्या बदल्यांचा या प्रक्रियेमध्ये समावेश आहे.
बदली प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी मागील काही वर्षांपासून ई-पोर्टलद्वारे समुपदेशन पद्धत अवलंबिली जाते. हीच पद्धत यावर्षी मुख्यालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ क्लार्क, अधीक्षक, कक्ष अधिकारी, सार्वजनिक बांधकाम व ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, सेवक-सेविका, सहाय्यक-सहाय्यिका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, पंचायत विभागातील ग्रामसेवक, शिक्षण विभागातील माध्यमिक शिक्षक, कृषी विभागातील कृषी सहाय्यक यांच्यासह वर्ग-३ कर्मचाºयांचा यामध्ये समावेश असणार आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाºयांना बदल्यांसाठी कराव्या लागणाºया कसरतींना ब्रेक लागणार असून यातून होणारी उलाढालही थांबणार आहे़
समुपदेशनासाठी असे आहे वेळापत्रक
शनिवार ५ मे २०१८ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत-बांधकाम विभाग. सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत-लघूपाटबंधारे विभाग, दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत- ग्रामीण पाणीपुरवठा विभाग. दुपारी १ ते २ वाजेपर्यंत-कृषी विभाग. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत- पशुसंवर्धन विभाग. दुपारी ३ ते ४ वाजेपर्यंत - महिला व बालकल्याण विभाग.
दुपारी ४ ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- सामान्य प्रशासन विभाग. रविवारी ६ मे २०१८ रोजी सकाळी ९ ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत- आरोग्य विभाग. बुधवार ९ मे २०१८ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत- अर्थ विभाग. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत- शिक्षण प्राथमिक व माध्यमिक विभाग. दुपारी २ ते बदली प्रक्रिया संपेपर्यंत. ग्रामपंचायत विभाग. या सर्व समुपदेशनाचे ठिकाण कै. यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद नांदेड हे राहील.