स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 03:59 PM2024-10-21T15:59:29+5:302024-10-21T16:00:06+5:30

ऐन बैठकीत एक वृद्ध मराठा आंदोलकाच्या सवालावर आमदार बालाजी कल्याणकर झाले निरुत्तर

Changing the party for yourself, what did you do for Maratha reservation? Shinde group MLA Balaji kalyankar speechless on old man's question | स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल

स्वतःसाठी पक्ष बदलता, मराठा आरक्षणासाठी काय केलं? शिंदे गटाच्या आमदाराला वृद्धाचा सवाल

नांदेड: शिंदे गटाचे नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांना वृद्ध मराठा आंदोलकाने एका गावातील बैठकीत तुम्ही स्वतःसाठी पक्ष बदलता, आरक्षणासाठी काय केले हे सांगा, असा जाब विचारला. हा व्हिडिओ निळा गावचा असून व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील वृद्धाच्या भावना मराठा समाजाच्या प्रातिनिधिक भावना गृहीत धरल्या तर विधानसभा निवडणुकीत 'जरांगे फॅक्टर' निर्णायक ठरेल अशा राजकीय अभ्यासकांच्या मताला बळ मिळते. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती, महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ती, मनसे आदी पक्षांची जोरदार तयारी सुरू केली आहे. भारतीय जनता पक्षाकडून ९९ उमेदवारांची पहिली यादीही जाहीर करण्यात आली असून मविआचं जागावाटप दोन दिवसांत जाहीर होणार असल्याची माहिती आहे. यातच मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी देखील रविवारी आपली भूमिका जाहीर केली. मराठ्यांची ताकद असेल त्याठिकाणी उमेदवार देणार, राखीव जागांवर आपल्या विचारांच्या उमेदवाराला पाठिंबा देणार, जिथे ताकद नसेल अशा ठिकाणी आपल्या मागण्या मान्य असल्याचे जो उमेदवार ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देईल, त्याला पाठिंबा देणार, अशी तिहेरी सूत्र सांगणारी भूमिका जरांगे पाटील यांनी शेकडो कार्यकर्ते आणि इच्छुकांच्या उपस्थितीत जाहीर केली. यामुळे मोठी राजकीय उलथापालथ दिसून येत्या काळात दिसण्याचे चित्र आहे. त्यानंतर मराठा समाज विधानसभेसाठी आक्रमक झाला आहे. जरांगे यांना कसा प्रतिसाद मिळेल यावर चर्चा होऊ लागल्या आहेत. यातच नांदेडच्या निळा गावातला असाच एक प्रसंग सध्या चर्चेत आला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या आधीपासून मनोज जरांगे यांनी मराठा आरणाच्या मुद्द्यावरून सरकारविरोधात व विशेषत: भाजपा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात टोकाची भूमिका घेतलेली आहे. या निवडणुकांत महायुती आणि भारतीय जनता पक्षाला फटका बसला यामागे जरांगे यांच्या आंदोलनातील मराठा समर्थकांची नाराजी हे देखील एक कारण आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर जरांगे यांनी उमेदवार उभे करण्याची अन् पाडायची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडच्या निळा गावात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. यंदाही त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जनसंपर्कासाठी भेटीगाठी सुरू केल्या असताना त्यांना हा अनुभव आला. व्हायरल झालेला व्हिडिओ नांदेडच्या निळा गावातील आहे. शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर हे निळा गावात मंतदारांशी संवाद साधत आहेत. त्याचवेळी बैठकीमधील एक वृद्ध मध्येच उठून आमदार कल्याणकर यांना सवाल करतो. यावेळी इतर गावकरी आसपास दिसत आहेत. वृद्ध जाब विचारात म्हणतो की, ''तुम्ही मराठा आरक्षणासाठी समाजासाठी काय केले, स्वतःसाठी पक्ष बदलता. पण समाजासाठी समोर कधी आलात. आमचा माणूस जरांगे सांगतील तसे होणार, ते जसे म्हणतील तसे शंभर टक्के होणार. ते सांगतील त्यांना निवडून आणायचे, ते सांगितल त्यांना पाडायचे. त्यांच्या शब्दावर समाज चालणार. जरांगे पाटील स्वतःच्या घरी गेले नाही, कुटुंबाकडे गेले नाही. आम्ही त्यांचेच ऐकणार.'' अशा तीव्र भावना ऐकून आमदार कल्याणकर निरुत्तर होऊन फक्त पाहत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Web Title: Changing the party for yourself, what did you do for Maratha reservation? Shinde group MLA Balaji kalyankar speechless on old man's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.