स्वस्त मद्यामुळे मद्यपींचे ‘थर्टीफर्स्ट’ तेलंगणात, महाराष्ट्राच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी दर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 06:39 PM2018-01-02T18:39:53+5:302018-01-02T18:45:52+5:30
जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात देशी दारूचे दर महाराष्ट्रापेक्षा ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील परमिट रुम थंडावले आहेत़ दरम्यान, काल थर्टीफर्स्ट असतानाही असंख्य परमिट रुम ओस पडले होते़
बिलोली (नांदेड) : नांदेड जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यात देशी दारूचे दर महाराष्ट्रापेक्षा ४० टक्क्यांनी स्वस्त असल्याने महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील परमिट रुम थंडावले आहेत़ दरम्यान, काल थर्टीफर्स्ट असतानाही असंख्य परमिट रुम ओस पडले होते़
मद्यपी शौकिनांनी थर्टीफर्स्ट तेलंगणा राज्यात जावून साजरा केला़ तर अनेकांनी पार्सल आणून पार्टी केली़ थर्टीफर्स्टला रविवार आल्याने तेलंगणाच्या शहरातील परमिट रुम सकाळपासूनच गर्दीने फुलून गेले़ नवीन झालेले तेलंगणा हे २७ वे राज्य असून नांदेड जिल्ह्यालगत आहे. बिलोली, धर्माबाद, भोकर, देगलूर, किनवट या पाच तालुक्यांशी अगदी जवळ सीमा आहे़ त्यामुळे या भागातून दळणवळण व्यवस्थाही सातत्याने होते़ ३१ तारखेला रविवार आला़ त्यामुळे सामान्य नागरिकांना थर्टीफर्स्ट एन्जॉय करण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही; पण विदेशी दारूच्या संदर्भात वेगळेच चित्र पाहण्यास मिळाले़ वर्षाचा शेवटचा दिवस, दरवर्षी होणारी चांगले गि-हाईक पाहता परमिट रुमचालकांनी रोषणाई करून दुकाने सजवले़, परंतु त्याकडे ग्राहकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले़ एकूणच लगतच्या तेलंगणात विदेशी दारूच्या दरात ४० ते ४५ टक्क्यांची तफावत असल्याचे पुढे आले़ परिणामी चारचौघे शौकीन एकत्र आले की लहान-सहान वाहन घेवून त्या राज्यात जावून थर्टीफर्स्ट एन्जॉय केला़ मित्र परिवार एकत्रित येवून होणार्या खर्चात आर्थिक बचत झाल्याने शौकिनांनी सकाळपासूनच तेलंगणाची वाट धरली़
एक तर कमी प्रवास व स्वस्ताची दारू, त्यामुळे त्या भागातील परमिट रुम सकाळी ११ वाजेपासून हाऊसफुल्ल झाले़ तर पहाटे ५ वाजेपर्यंत परमिट रुम चालू ठेवण्यासाठी तेथील सरकारने परवानगी दिली होती़ दरातील मोठी तफावत पाहता थर्टीफर्स्ट असूनही रात्री उशिरा चालू राहणारे या भागातील परमिट रुम दहा वाजताच सामसूम झाले. अवघ्या दहा कि़मी़ अंतरावरील तेलंगणा राज्यात विदेशी दारूच्या दरात तब्बल ४० ते ५० टक्के तफावत झाल्याने परमिटरूमचालक अडचणीत आले़
तेलंगणात परमिट रुम परवान्याचा होतो लिलाव
दराच्या संदर्भात तेलंगणा राज्यातील राज्य उत्पादन शुल्क अधिकार्यांकडून माहिती घेतली असता ते म्हणाले, तेलंगणात परमिट रुम आणि वाईन शॉपच्या परवान्याचा स्पर्धात्मक लिलाव होतो व विक्रीचा परवाना दिला जातो़ त्याचप्रमाणे वेगवेगळ्या दारू कंपनीच्या कारखान्यातून थेट परवानाधारकांना उत्पादित दारू पुरविली जाते़ परवाना लिलाव पद्धतीमुळे शासनाच्या महसूलमध्ये प्रचंड वाढ होते़ दारूवरील कर लावण्याचे धोरण वेगळी पद्धती असून परवाना नूतनीकरणही सप्टेंबर अखेरपर्यंत होते़ परवानाधारकांच्या स्पर्धात्मक लिलाव पद्धतीमुळे ठरावीक महसूल पेक्षाही जास्तीचा महसूल शासनाला मिळतो़ पण कर कमी असल्यामुळे छापील दरात दारूची विक्री होते़ दारू उत्पादक ते परवानाधारक यामध्ये ठोक परवानाधारकाची पद्धत नसल्याने दरात मोठी तफावत येते़.