कमी पैशात धान्य देण्याच्या आमिषाने ९ हजार महिलांची फसवणूक; तेराशे महिलांच्या तक्रारी
By प्रसाद आर्वीकर | Published: October 10, 2023 06:26 PM2023-10-10T18:26:52+5:302023-10-10T18:28:17+5:30
या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अन्नधान्यही जप्त केले आहे. त्यामध्ये १९७ पोती तांदूळ, ४३ पोती गहू, ६ पोती साखर, ३० पोती पोहे, तेलाचे पॉकेट, वॉशिंग पावडरची दोन पोती आदींचा समावेश आहे.
शेखर पाटील
मुखेड : मुखेडसह कंधार, नायगाव, बिलोली या तालुक्यांतील तब्बल ९ हजार महिलांना कमी पैशात धान्य पुरवठा करतो, असे सांगून गंडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणामध्ये तेराशे महिलांनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रारी केल्या आहेत. मात्र, पोलिसांचा तपास अजूनही संथ गतीने सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य अन्नदाता सुविधा केंद्र मुखेड यांच्या वतीने फक्त महिलांसाठी योजना असल्याचे सांगून महिला एजंटांच्या माध्यमातून हजारो महिलांचे आधार कार्ड, पासपोर्ट फोटो जमा करण्यात आले. २१०० रुपये आणि २३५० रुपयांप्रमाणे रक्कमही जमा करण्यात आली. यातील काही महिलांना धान्य पुरवठा केला. तर अनेक महिलांना धान्य पुरवठा करण्यात आला नाही. मुखेड पोलिस ठाण्यात या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राजकुमार घोडके यास अटक केली आहे. त्याला १० ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती; परंतु पोलिस कोठडीत पोलिसांना कोणताही पुरावा हाती लागला नाही. या गैरव्यवहारात श्री गोविंदराज ग्रामीण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कोणाची आहे? व अन्य आरोपी कोण आहेत? हे धर्मादाय कार्यालयातून आल्यानंतर आम्ही तपास करणार, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
या प्रकरणांमध्ये पोलिसांनी अन्नधान्यही जप्त केले आहे. त्यामध्ये १९७ पोती तांदूळ, ४३ पोती गहू, ६ पोती साखर, ३० पोती पोहे, तेलाचे पॉकेट, वॉशिंग पावडरची दोन पोती आदींचा समावेश आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी रेशनकिट पावत्या पोलिस ठाण्यामध्ये जमा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानंतर सुमारे १३०० महिलांनी रक्कम भरलेल्या पावत्या पोलिस ठाण्यामध्ये जमा केल्या आहेत.कोट्यवधीचा गंडा घालणाऱ्या या केंद्र चालकाने एवढा अन्नधान्याचा साठा कोठून खरेदी केला? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तहसील कार्यालयाची चुप्पी
अन्नधान्याचे किट घेण्यासाठी महिलांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. एवढा मोठा अन्नधान्य साठा आणला कुठून याची साधी चौकशी तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने केली असती तर आज ही फसवणूक झाली नसती. सध्या तरी पुरवठा विभागाची हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका आहे.