बिलोलीत एसटी प्रवर्गातील ३ हजार कर्मचार्यांच्या जात प्रमाणपत्रांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 04:31 PM2018-01-13T16:31:57+5:302018-01-13T16:34:10+5:30
शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती (एस़टी़) प्रवर्गातील तीन हजार कर्मचारी व अधिकार्यांच्या जात प्रमाणपत्रांच्या मूळ संचिकांचा शोध बिलोलीच्या अभिलेख कक्षात सुरू आहे़ दरम्यान, या शोध मोहिमेसाठी १५ महसूल कर्मचारी १९८० पूर्वीच्या दस्तऐवजांचा शोध घेत आहेत़
- राजेश गंगमवार
बिलोली ( नांदेड ) : शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनुसूचित जमाती (एस़टी़) प्रवर्गातील तीन हजार कर्मचारी व अधिकार्यांच्या जात प्रमाणपत्रांच्या मूळ संचिकांचा शोध बिलोलीच्या अभिलेख कक्षात सुरू आहे़ दरम्यान, या शोध मोहिमेसाठी १५ महसूल कर्मचारी १९८० पूर्वीच्या दस्तऐवजांचा शोध घेत आहेत़
बिलोली तहसील कार्यालयात बिलोली, धर्माबाद, नायगाव व उमरी या चार तालुक्यांतील जुने रेकॉर्ड उपलब्ध आहे़ या शोधमोहिमेमुळे बनावट प्रमाणपत्राद्वारे लाभ घेतलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत़ बिलोली या सीमावर्ती तालुक्यासह धर्माबाद, उमरी, देगलूर, कुंडलवाडी शहर व खेड्यापाड्यांत अनुसूचित जमातीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे़ परिणामी २०११ च्या जनगणनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेत एसटीसाठी बर्याच जागा आरक्षित आहेत़ सन २००२ मध्ये तर बिलोली, कुंडलवाडी व देगलूर या तीन पालिकेत थेट नगराध्यक्षांच्या निवडणुकीत एसटी उमेदवारच निवडून आले़ मन्नेरवारलू व महादेव कोळी या समाजाची संख्या मोठी आहे़ राजकीय आरक्षणापाठोपाठ शैक्षणिक व शासकीय नोकरीतही या भागातील अधिकारी व कर्मचारी शासकीय सेवेत वर्ग १, वर्ग २ व ३ पदावर कार्यरत आहेत़ बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, देगलूर, जारीकोट या गावांत तर एसटीचीच संख्या जास्तीची असल्याने या भागातील असंख्य जण शासकीय व निमशासकीय सेवेत कार्यरत आहेत़
केंद्र व राज्य शासनाच्या आदेशान्वये अनुसूचित जमातीच्या सर्व जात प्रमाणपत्र तपासणीसाठी एसआयटी (विशेष तपासणी समिती) गठीत करण्यात आली़ आयुक्तांच्या आदेशान्वये असंख्य एसटी प्रवर्गातील कर्मचारी व अधिकार्यांनी नामसाधर्म्याचा फायदा घेवून अनुसूचित जमातीची बोगस जात प्रमाणपत्र काढल्याचे पुढे आले आहे़ कित्येक वर्षांपासून असे कर्मचारी व अधिकारी बोगस प्रमाणपत्रावरच सेवेत कार्यरत आहेत़ यापूर्वी औरंगाबाद जात पडताळणी विभागानेही अशा बोगस प्रमाणपत्रांना वैधता प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले़ परिणामी एसआयटीमार्फत सर्व आरक्षित जागेवरील कर्मचार्यांच्या शासनदरबारी असलेल्या मूळ महसुली व शैक्षणिक पुराव्याच्या संचिका शोधून संपूर्ण अहवाल पुराव्यानिशी तत्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या़
सन १९९५-९६ मध्ये २८५ खेडी असलेल्या बिलोली तालुक्याचे विभाजन होवून धर्माबाद व नायगाव तसेच उमरी तालुके निर्माण झाले़ परिणामी या चारही तालुक्यांतील निजाम राजवटीतील उर्दू भाषेतील दस्तऐवज उपलब्ध आहेत़ या चारही तालुका पातळीवर शोधमोहीम सुरू आहे ; पण बिलोली अभिलेख कक्षात स्वातंत्र्यापूर्वीचेही जुने रेकॉर्ड असल्याने बिलोली अभिलेख कक्षाला महत्त्व आहे़ मागील दोन महिन्यांपासून अनुसूचित जमाती प्रवर्गात मोडणार्या तीन हजार जणांची मूळ संचिका शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे़ नायब तहसीलदार डॉ़ओमप्रकाश गौंड, चंद्रकांत बिजमवार, डी़ पी़ रामपुरे, सुरेश कल्लुरे, एम़ के़ बाचेवाड, एम़बी़ हजारे, माधव फुलोळे, एम़डी़ सूर्यवंशी, प्रदीप घाटे, शेख हाजी, नाहीदा बेगम, एऩटी़ गुट्टे, शिवकुमार देवकत्ते हे सर्व महसूल कर्मचारी रेकॉर्ड रुममधून जुन्या सर्व संचिका शोधत आहेत़ काही जणांच्या मूळ संचिकाच उपलब्ध नसून बनावट प्रमाणपत्राद्वारेच शासकीय सेवेत कार्यरत आहेत़ सन १९८५-९५ या दशकात बिलोली तालुका लिंगडेर (अनु़जाती) या बोगस प्रमाणपत्रामुळे संपूर्ण राज्यात गाजला होता़
सीमावर्ती भागात समाजाची संख्या अधिक
सन २०१६-१७ या वर्षातील एम़बी़बी़एस़ वैद्यकीय प्रवेश मिळविलेल्या चार विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत़ बिलोली तालुक्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातून या चौघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता़ दोन महिने महाविद्यालयात रूजू होवूनही बनावट जात प्रमाणपत्रामुळे चौघांचे प्रवेश रद्द झाले़ प्रकरण उच्च, सर्वोच्च न्यायालय व विशेष तपासणी समितीकडे गेले होते; पण मूळ संचिका, महसुली पुरावे, शैक्षणिक पुरावे, जात प्रमाणपत्र बोगस निघाल्याने शासकीय एमबीबीएसचा प्रवेश रद्द झाला़ सध्या या चारही विद्यार्थ्यांना घरी बसण्याची वेळ आली़ आता शासनाकडून प्रवेशापूर्वीच जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य केल्याने असंख्य जणांचे धाबे दणाणले आहेत़ प्रामुख्याने मराठवाड्यात एसटी प्रवर्गात मन्नेरवारलू व महादेव कोळी समाजाची संख्या सीमावर्ती भागातच जास्तीची आहे़ लगतच्या तेलंगणा राज्यात मन्नेरवारलू ही जात ओबीसी प्रवर्गात मोडते.
एस़आय़टी़ची स्थापना
एस़आय़टी़ची स्थापना झाल्याने आयुक्त व जिल्हाधिकार्यांच्या आदेशान्वये अनु़जमाती प्रवर्गातील सर्व मूळ संचिका मागविल्या आहेत़ त्यानुसार जवळपास ३ हजार संचिकांचा शोध सुरू आहे़ मूळ संचिकांचे स्कॅन करून अहवाल सादर करावयाचा असल्याने सर्व कर्मचारी या विशेष कामासाठी नेमण्यात आले आहेत -विनोद गुंडमवार, तहसीलदार, बिलोली़